| सांगली समाचार वृत्त |
कुडाळ - रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ विभाग क्र. ०२ च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे काल पिंगुळी येथे केलेल्या धाडसी कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान एक अल्टो चारचाकी (क्रमांक: एम.एम/एच-२२०७) पथकाने अडवून तपासणी केली असता, वाहनाच्या आतील भागात गोवा बनावटीच्या देशी विदेशी दारूचे एकूण ३३ बॉक्स आढळले. अंदाजे रु. २,८२,४००/- किंमतीचा हा मद्यसाठा व वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
सदर तस्करीत वापरण्यात आलेल्या वाहनाचा चालक सायमन गोन्स्लावीस (वय २२, रा. ख्रिश्चनवाडी, होडावडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) यास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोवा राज्यातून मद्याची चोरटी वाहतूक करून ती महाराष्ट्रात वितरणासाठी आणली जात असल्याचा संशय असून, या नेटवर्कमध्ये आणखी व्यक्ती संलग्न असण्याची शक्यता तपासात पुढे येत आहे. तस्करीसाठी छोट्या चारचाकी वाहनांचा वापर करून अधिकार यंत्रणांना गंडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे निरीक्षण आहे.ही महत्त्वपूर्ण कारवाई मा. अधीक्षक श्री. मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक श्री. उदय थोरात, सौ. अर्चना वंजारी, श्री. सूरज चौधरी, तसेच श्री. वैभव कोळेकर, श्री. प्रसाद खटाटे, श्री. साईनाथ मेहकर, श्री. संदीप कदम (वाहनचालक) व मदतनीस श्री. अवधूत सावंत, श्री. विजय राऊळ, प्रशांत परब यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली.
पुढील तपासाची धुरा श्री. उदय थोरात, दुय्यम निरीक्षक यांच्याकडे असून, तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.