| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळतानाचे दृश्य व्हायरल झाल्याने चर्चेत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अखेर कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. मात्र त्यांचे मंत्रिपद कायम ठेवण्यात आले असून, आता त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोकाटे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत या खातेबदलावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संबंधित प्रस्ताव सादर केला आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना ही माहिती देण्यात आली.
या नव्या घडामोडीनुसार, विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा भार सोपवण्यात आला आहे, तर कोकाटे यांना त्यांच्या जागी भरणे यांच्याकडील क्रीडा खाते देण्यात आले आहे.
सदरील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची मागणी वाढत होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कडक समज देत त्यांच्या वरिष्ठतेचा विचार करून मंत्रिपद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. बैठकीत कोकाटेंना पुढे असे प्रकार पुन्हा घडल्यास मंत्रिपद गमवावे लागेल, असा इशारा दिला गेल्याचे समजते.
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे कृषी खाते सोपवण्याचा प्रस्तावही पुढे आला होता. मात्र, त्यांनी सध्या नव्याने मिळालेल्या खात्याची जबाबदारी नीट समजून घेण्याची गरज व्यक्त करत कृषी खात्याबाबत नकार दिला. परिणामी, कृषी खात्याची सूत्रे दत्ता भरणे यांच्या हवाली करण्यात आली.
या घडामोडीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना सार्वजनिक वादांपासून दूर राहण्याचा सक्त इशारा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून यापूर्वीच राज्यपालांकडे वादग्रस्त मंत्र्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती.