| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५
निराधार व अनाथ बालकांना आधार ओळखपत्र मिळवून देणाऱ्या ‘साथी’ मोहिमेचा उपक्रम केवळ प्रशंसनीयच नव्हे, तर त्यांच्या भावी आयुष्यातील शिक्षण, आरोग्य आणि रोजगार संधींना गती देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात ते अध्यक्षस्थानी होते. या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना केवळ ओळखीचा दस्तऐवज मिळतो आहे असे नाही, तर त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार केला जातो आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या शिबिरात १९ निराधार बालकांना आधार नोंदणी करण्यात आली, तर त्याचवेळी आरोग्य तपासणीही पार पडली. हा उपक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला.
कार्यक्रमास तहसीलदार लीना खरात, अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. एन. आर. देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि. दा. सारंगकर, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघा पाटील, अॅड. अशोक वाघमोडे (सांगली वकील संघ अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात विविध बालगृहांतील २१ बालकांसह संबंधित कर्मचारीही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन अधीक्षक शंकरराव वानखडे यांनी केले.
‘साथी’ मोहिमेच्या माध्यमातून बालकांच्या सक्षमीकरणासाठी चालविण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सर्व समाजाने हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.