yuva MAharashtra "विरोध झाला की माझ्यातील खरा माणूस जागा होतो" : जयंत पाटलांचा टोला

"विरोध झाला की माझ्यातील खरा माणूस जागा होतो" : जयंत पाटलांचा टोला

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५

भाजपमध्ये माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या नुकत्याच झालेल्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “मी शांत असतो, पण जेव्हा समोरून विरोध सुरू होतो, तेव्हाच माझ्या मनातील खरी चेतना जागृत होते,” अशा शब्दांत त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

सांगलीत आयर्विन नवीन पुलाच्या कामाची पाहणी करताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी डांगे यांच्या पक्षांतराविषयी बोलताना सांगितले, “राजकारणात काही लोक कायमच वेगळे होतात, त्यांची दिशा ठरलेलीच असते. पण जे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाम उभे राहतात, त्यांच्याबाबत मला खात्री आहे. फुटणाऱ्यांविषयी मी काही बोलण्यात वेळ वाया घालवत नाही.”

राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका करताना ते म्हणाले, “आज सरकारमधील अनेक मंत्री बेधडक वक्तव्ये करतात, अराजक निर्माण करतात, पण मुख्यमंत्री मात्र त्यांची पाठराखण करताना दिसतात. केवळ कृषीमंत्री कोकाटे यांच्याच राजीनाम्याची चर्चा नाही, तर सरकारची एकंदर प्रतिमा जनतेसमोर कशी उभी राहते, याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी.”

कामाच्या थकबाकीच्या मुद्द्यावर बोलताना पाटील म्हणाले की, “राज्यात सुमारे पाच लाख ठेकेदारांची नऊ हजार कोटी रुपयांची बिले रखडली आहेत. प्रशासनाकडून दबाव आणि भीतीचं वातावरण आहे. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही याच व्यवस्थेच्या दडपणाचे भयावह परिणाम आहे. सरकार तांत्रिक कारणांची आड करून जबाबदारी झटकत आहे.”

दरम्यान, सांगलीतील आयर्विन पुलाला समांतर सुरू असलेल्या नव्या पुलाच्या प्रगतीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कामाला गती मिळाली होती. काही अडथळ्यांमुळे विलंब झाला असला तरी पुढील पंधरा दिवसांत हा पूल सांगलीकरांच्या सेवेसाठी खुला केला जाईल.”