| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५
राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक वर्षासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारकडून आगामी दहा वर्षांसाठी व्यापक धोरणात्मक आराखडा राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वाच्या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, कामगार चळवळीचे नेते अभिजित राणे यांच्यासह छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे नानासाहेब जावळे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, पंजाबराव काळे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान एकूण १० ठळक मागण्या व एक विशेष प्रस्ताव सादर केला. सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाईची विनंती यामध्ये प्रमुख होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने योग्य निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी ७०० कोटींचा निधी आणि सारथी शिक्षण संस्थेसाठी भरघोस आर्थिक तरतूद तात्काळ वितरित करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्व. अण्णासाहेब जावळे-पाटील यांच्या नावे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.