| सांगली समाचार वृत्त |
तिरुअनंतपुरम - सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५
गेल्या पन्नास वर्षांपासून केवळ दोन रुपयांत हजारो गरजू रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर एके रायरू गोपाल यांचे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोपरत्वे त्यांच्या आरोग्याची स्थिती काही काळापासून खालावली होती.
'दोन रुपयांचे डॉक्टर' म्हणून जनमानसात ओळख निर्माण करणाऱ्या या सेवाभावी वैद्यकिय व्यक्तिमत्त्वाचा दवाखाना पहाटेपासून उघडायचा. सकाळी चारपासून संध्याकाळी चारपर्यंत चालणाऱ्या या दवाखान्यात गरीब रुग्णांची अलौकिक सेवा केली जायची. काही रुग्णांकडे औषधांसाठीही पैसा नसेल, तर गोपाल सर स्वतःच्या खर्चाने औषध पुरवायचे."जनतेचा डॉक्टर" अशी उपाधी त्यांना लोकांनी दिली होती. त्यांच्या घरातील 'लक्ष्मी निवास' या ठिकाणीच त्यांनी उपचार केंद्र सुरू केले होते. शेवटच्या काही महिन्यांत प्रकृती खालावल्यामुळे पहाटेचा वेळ थोडा पुढे ढकलून सकाळी सहा वाजता दवाखाना सुरू होत असे. मे २०२४ मध्ये प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना शेवटी दवाखाना कायमचा बंद करावा लागला.
डॉ. गोपाल यांच्या निधनानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, "पाच दशके समाजासाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्या या थोर डॉक्टरांनी केवळ दोन रुपयांत सेवा देत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे गरीब रुग्णांना आधार मिळाला."