| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २४ जुलै २०२५
सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळाचे मैदान ठरण्याची जुनी सवय आता मोडली पाहिजे. शिक्षक हे समाजाचे आदर्श असतात, आणि त्यांच्या प्रत्येक कृतीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते. त्यामुळे अशा सभांमध्ये संयम व चर्चा हेच योग्य मार्ग आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या चार मजली प्रशस्त इमारतीचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात आमदार इद्रिस नायकवडी, शिक्षक नेते संभाजी थोरात, उप निबंधक सुनील चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णु माने यांची उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी शिक्षक बँकांच्या सभांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या वादंगाबाबत चिंता व्यक्त केली. "संवाद आणि संयम यांद्वारे विकास शक्य होतो. संचालक मंडळ जर पारदर्शक आणि विश्वासू कारभार करत असेल, तर सभासदांचा पाठिंबा निश्चित मिळतो," असे ते म्हणाले.
बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, शिक्षकांच्या बारा संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून ही इमारत साकार झाली असून, केवळ सव्वा वर्षाच्या कालावधीत ही सुविधा उभी राहिली आहे. या माध्यमातून शिक्षक सभासदांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी बँकेच्या नफ्यातून इमारतीसाठी केलेली तरतूद ही दूरदृष्टीची खूण असल्याचे नमूद करत, "या बँकेकडून भविष्यात राज्यातील आघाडीच्या सहकारी बँकांमध्ये स्थान मिळवले जाईल," असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपाध्यक्षा अनिता काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास संचालक अमोल शिंदे, शामगोंडा पाटील, रूपाली गुरव, शिवाजी जाधव, अमोल माने, महादेव हेगडे, बाळासाहेब कटारे, हंबीरराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.