| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - गुरुवार दि. २४ जुलै २०२५
शिराळा परिसरातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान ठरलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळाच्या विकासकामांना नवसंजीवनी मिळाली आहे. या स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित यंत्रणांना कामे निर्धारित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
शिराळा येथे नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत मंत्री पाटील यांनी स्मृतीस्थळाच्या विविध अंगांचा सखोल आढावा घेतला. या वेळी स्थानिक आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १३ कोटी ४६ लाख रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर केली असून, स्मृतीस्थळाच्या आराखड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा, आकर्षक प्रवेशद्वार, त्यांच्या जीवनकार्याचा चित्ररूपी इतिहास साकारणारा खास वाडा, पार्किंगची सुविधा, आधुनिक स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, तसेच अग्निशमन यंत्रणा आदी बाबींचा समावेश आहे.
मंत्री पाटील यांनी या स्मारकाला केवळ स्थापत्य स्वरूपात न ठेवता, ते संभाजी महाराजांच्या शौर्य, विचारधारा आणि बलिदानाचे प्रेरणास्थान व्हावे, यासाठी सुसंगत आणि दृष्टीकोनात्मक दृष्टिकोनातून कामे पार पाडावीत, असा आग्रह धरला.