yuva MAharashtra २४ जुलै : माझ्या पत्रकारितेचा सुवर्ण महोत्सव !

२४ जुलै : माझ्या पत्रकारितेचा सुवर्ण महोत्सव !

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २४ जुलै २०२५

२४ जुलै...
ही एक कॅलेंडर वरील साधी तारीख नाही, 
तो माझ्या जीवनातील अनमोल दिवस आहे.

२४ जुलै १९५८ — माझा जन्मदिवस...
आणि
२४ जुलै १९७५ — माझ्यातील "पत्रकाराचा" जन्मदिवस...
या दोन्ही तारखा माझ्या आयुष्यातील दोन अढळ कोपरे बनल्या आहेत.

माझे पिताश्री, स्व. एन्. बी. सरडे यांनी रुजवलेली दैनिक सांगली समाचार ची बीजं माझ्या रक्तात मिसळली होती. त्या एका छोट्याशा कार्यालयातून सुरू झालेला प्रवास, माझ्या विचारांचा व्यासपीठ ठरला. पण ही वाट गुलाब पाकळ्यांनी नटलेली नव्हती. प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता, अडचणी होत्या... आणि त्या प्रत्येक अडथळ्यातून मी स्वतःला घडवत गेलो.

दैनिक सांगली समाचार माझ्या वडिलांचा... आपसुकच दैनिकाचे, वडिलांच्या नावाचं वलय माझ्याभोवती तयार झालं होतं... मलाही पत्रकार व्हायचं होतं... वडिलांचं मत होतं, पहिल्यांदा शिक्षण पूर्ण कर... मग प्रेस व्यवसायात ये... तेव्हा शालेय अभ्यासाबरोबरच पत्रकारितेचंही अवलोकन सुरू केलं... 

मला आजही आठवतंय... मी पहिली बातमी लिहिली ती माझ्या वाढदिनी... एका पत्रकार बैठकीची... ती बातमी वडिलांसमोर ठेवली... वडील बातमी वाचत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा मी प्रयत्न करीत होतो... पण अंदाज येत नव्हता. बातमी वाचून झाल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलावलं... मला वाटलं आता पाठीत रपाटा बसणार. पण वडिलांनी पाठ थोपटली. खिशातून दहा रुपयांची नोट काढली आणि माझ्या हातावर ठेवली आणि म्हटलं... "छान लिहिलंयस...." 

फक्त दोनच शब्द...
त्या दहा रुपयाचे मोल मला दहा लाखांपेक्षा अधिक होतं... त्यापेक्षा अधिक मोल होतं, वडिलांच्या पाठीवर मिळालेल्या शाब्बासकीचं... त्यांच्या त्या दोन शब्दांचं... 
आणि इथूनच सुरू झाला एक प्रवास.... 
माझ्या पत्रकारितेचा... असो... 

“जे जे भेटे, ते ते पाहे चित्तीं धरावे।” 
असं संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणं

या पन्नास वर्षांच्या प्रवासात, अनेक चेहरे, अनेक प्रवृत्ती अनुभवल्या. काहींनी आधार दिला, काहींनी पाय ओढले. पण मी राग धरला नाही... कुणावर दोष ठेवला नाही... ज्यांनी कटु अनुभव दिला, त्यांना विसरुन गेलो. ज्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली, त्यांना आजही विसरलो नाही. ना ही विसरु शकत... फक्त अनुभवांचे गाठोडं हृदयात साठवत गेलो.

“कसोटीचा क्षण जो हसत पार करतो, 
तोच खरा साधक होतो ।” हे समर्थ रामदास स्वामींचे शब्द प्रत्यक्षात जगत होतो...

पत्रकाराची लेखणी दुधारी तलवार असते, हे सत्य आहे. पण माझ्या लेखणीला मी कधीही कटुतेचे शिसे चढवले नाहीत. अन्यायाच्या समोर मी नतमस्तक झालो नाही. पण व्यक्तिगत सूडासाठी ती लेखणी कधीही वापरली नाही.

“जीवन हे वाळवंट, हवी शब्दांची सावली।”
असं संत तुकारामांनी म्हटलंच आहे...

वडिलांच्या निधनानंतर १९८९ मध्ये सांगली समाचार ची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. त्या बातम्यांच्या अक्षरांतून मी सांगली समाचारला नव्या स्वरूपात जन्म देण्याचा ध्यास घेतला. कधी झोप हरवली, कधी थकवा विसरला. पण नियतीची वक्ररेषा, अपुरे साधनसामर्थ्य आणि मर्यादित संसाधनं... यामुळे अखेर सांगली समाचार बंद करावा लागला. ते क्षण, ते दु:ख शब्दात मांडता येणार नाहीत.

इथं कवी सुरेश भट यांची एक कविता आठवतेय...

मित्र कोण शत्रू कोण,
गणित साधे कळलेच नाही...
नाही भेटला कोण असा,
ज्याने मला छळले नाही...
सुगंध सारा वाटत गेलो,
मी कधीच दरवळलो नाही...
ऋतू नाही असा कोणता,
ज्यात मी होरपळलो नाही...
केला सामना वादळाशी,
त्यापासून पळालो नाही...
सामोरा गेलो संकटांना,
त्यांना पाहून वळलो नाही...
पचवून टाकले दु:ख सारे,
कधीच मी हळहळलो नाही...
आले जीवनी सुख जरी,
कधीच मी हुरळलो नाही...
कधी ना सोडली कास सत्याची,
खोट्यात कधीच मी रमलो नाही...
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे,
मी कुणाला कळलोच नाही...

“कधी तरी हरणे ही देखील विजयाची वाट असते।” या संत कबीरांच्या दोह्याप्रमाणं हे दु:ख एकांतात ढाळलेल्या अश्रूबरोबर पिऊन टाकले... कारण पुरुषाला चारचौघात अश्रू ढाळता येत नाहीत...

तरीही माझ्यातील पत्रकारितेची ज्योत विझून दिली नाही. स्वास्थ्य फॅमिली केअर, नवचैतन्य टाईम्स, संकेत भारत, अमन एक्स्प्रेस, तिसरा डोळा, सांगली दर्पण... या प्रत्येक माध्यमातून मी पुन्हा पुन्हा उभा राहिलो.

वाचकांचा विश्वास, साथ आणि अंतर्मनातील लेखणीची ओढ — या साऱ्या गोष्टींनी मला जिवंत ठेवलं.

आज वेब पोर्टलच्या माध्यमातून सांगली समाचार पुन्हा  आहे. महापालिका क्षेत्राच्या चौकटीत सिमीत राहिलेले हे नाव, आज डिजिटल पंख लावून सातासमुद्रापार पोहोचते आहे. वाचकांनी दिलेलं भरघोस प्रेम हेच माझ्या लेखणीचं सार्थक आहे.

पत्रकारिता माझा व्यवसाय नाही. तो माझा ध्यास आहे. माझा श्वास आहे. त्या लेखणीला सत्याची धार कायम ठेवणं, आणि समाजहितासाठी ती वापरणं — हेच माझं व्रत आहे.

तुमचे सहकार्य म्हणजे माझ्यासाठी पुरस्कार, प्रोत्साहन आणि प्रेरणा — असा त्रिवेणी संगम आहे...

"सांगली समाचार" चा प्रवास केवळ एका वृत्तपत्राचा इतिहास नाही, तर तो एका ध्येयवेड्या मनाच्या, न थकणाऱ्या लेखणीच्या आणि जिवंत विचारांच्या प्रवाहाचा प्रवास आहे. तो प्रवास आता नव्या चैतन्याने, नव्या उमेदीने पुढे चालला आहे.

"भेटलेला प्रत्येक शब्द,
तोच पुढचा प्रकाशवाट ठरतो..."

तसंच तुमचा हा आत्मीय स्नेह, ही ओळख, ही साथ — यालाच मी ‘सतत चालणाऱ्या एकत्र प्रवासाची भागीदारी’ मानतो. 

कारण

"एकाच ध्येयासाठी चालणाऱ्यांची पावलं कधीच एकटी वाटत नाहीत."

हा सुंदर प्रवास सुखद होतो आहे, याचा मला गर्व नाही — समाधान आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की, या साऱ्यांबद्दल "मी आपले आभार मानणार नाही..." तेव्हा मला जाणवतं की, ही ओळख आता स्नेहाच्या पलिकडे गेली आहे.

"कृतज्ञतेची भाषा शब्दांची नसते, ती मनाने जाणवते."

शतशः नम्र कृतज्ञता...

आजवर लाभलेल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी मन:पूर्वक कृतज्ञ आहे. आणि यापुढेही हा प्रवास असाच प्रामाणिकपणे, ताठ मानेने, लेखणीला साक्ष ठेवून चालत राहील, याचा शब्द देतो.

“सत्यासाठी चाललो वाट,
कंटाळा नसे, न भीती मात॥”

खरं तर मनात खूप काही आहे, खूप काही सांगायचं, लिहायचं मनात आहे... पण विस्तारभयास्तव इथंच थांबतो...

धन्यवाद…