yuva MAharashtra मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक निकाल; सर्व आरोपी निर्दोष, एटीएस सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक निकाल; सर्व आरोपी निर्दोष, एटीएस सर्वोच्च न्यायालयात जाणार

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. २२ जुलै २०२५

देशाच्या आर्थिक राजधानीत ११ जुलै २००६ रोजी झालेल्या मुंबईतील लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोटांनी देश हादरला होता. या भीषण हल्ल्यांत २८४ जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे ८०० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. तब्बल दोन दशके न्यायालयीन प्रक्रियेनंतर या प्रकरणावर आज एक मोठा वळण देणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. विशेष म्हणजे, सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेले सर्व १२ आरोपी उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले आहेत.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने २०१५ साली ५ आरोपींना फाशीची आणि उर्वरित ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोषसिद्धी रद्द करत, आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे तुरुंगात काढलेले अनेक आरोपी लवकरच कारागृहातून मुक्त होतील. पुण्यातील येरवडा कारागृहात असलेले बशीर खान आणि मुजम्मिल शेख हे त्यात प्रमुख आहेत.

या धक्कादायक निकालावर समाजाच्या विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी हा निर्णय आश्चर्यचकित करणारा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

राज्याच्या वतीने खटल्यात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजा ठाकरे आणि विशेष सरकारी वकील चिमलकर यांनी बाजू मांडली होती. खंडपीठासमोर सुनावणीचा शेवट २७ जानेवारी २०२५ रोजी झाला होता आणि आजचा निकाल त्याचाच निष्कर्ष आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण निकालाचे बारकाईने विश्लेषण करून विशेष सरकारी वकिलांशी सल्लामसलत केली जाईल. त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल.