| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - मंगळवार दि. २२ जुलै २०२५
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर करत संपूर्ण राजकीय वर्तुळात आश्चर्याची लाट निर्माण केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलेल्या राजीनाम्यात त्यांनी वैद्यकीय कारणांमुळे पदत्याग करत असल्याचे नमूद केले आहे.
धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात वैद्यकीय सल्ल्यानुसार आरोग्य प्रथम मानणे आवश्यक ठरल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
२०२२ मध्ये उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या धनखड यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत असण्याची अपेक्षा होती. मात्र, तीन वर्षांच्या कार्यकाळानंतरच त्यांनी पदातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या कार्यकाळात सहकार्य करणाऱ्या सर्व मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.धनखड यांचा कार्यकाळ काही महत्त्वाच्या घटनांनी गाजलेला असून काही निर्णय वादग्रस्तही ठरले होते. तरीही त्यांनी आपल्या जबाबदारीची पूर्तता करत लोकशाही प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेतला.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या आपल्या राजीनामापत्रात त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या पाठिंब्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याचीही प्रामाणिकपणे दखल घेतली. संसदेतील सदस्यांकडून लाभलेले प्रेम आणि विश्वास हे त्यांच्या स्मृतीत सदैव जपले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अनुभव, देशाच्या प्रगतीचा भाग होण्याची संधी, आणि जागतिक पातळीवरील भारताच्या यशाचा साक्षीदार होण्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. ‘या ऐतिहासिक परिवर्तनाच्या पर्वात देशसेवा करण्याचा सन्मान लाभला, याचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे,’ असे त्यांनी आपल्या पत्रात भावनिक शब्दांत म्हटले आहे.