yuva MAharashtra वसंतदादा पाटील स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात; उद्घाटन फेब्रुवारी 2026 मध्ये - चंद्रकांतदादा पाटील

वसंतदादा पाटील स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात; उद्घाटन फेब्रुवारी 2026 मध्ये - चंद्रकांतदादा पाटील

                         फोटो सौजन्य : महासंवाद

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २२ जुलै २०२५

सांगलीतील स्टेशन चौकात उभारण्यात येत असलेले पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारक अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे 9 कोटी रुपयांची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असून, 2026 च्या फेब्रुवारी महिन्यात या भव्य स्मारकाचे उद्घाटन होणार असल्याचे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांनी डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्मारक परिसराची पाहणी केली. या दौऱ्यात जयश्री पाटील, जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

2003 मध्ये सुरू झालेल्या या स्मारक प्रकल्पाला सुरुवातीला केवळ एक कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये काही निधी मिळाला असला, तरी स्मारकाचे काम वेळोवेळी थांबत गेले. जयश्री पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर नगरविकास विभागामार्फत सुमारे 8.28 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यास लवकरच अंतिम मंजुरी मिळणार आहे.

शासनस्तरावरून निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे असून, यापूर्वी उरलेला निधी आणि त्यावरील व्याज धरून सध्या जवळपास 9 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या निधीमधून स्मारकाचे उर्वरित काम, मजबुतीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साकारले जाणारे हे स्मारक जनतेच्या सेवेसाठी खुले होणार असून, सांगलीच्या सामाजिक आणि राजकीय वैभवाची जाणीव करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.