| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ९ जुलै २०२५
सांगली पोलिस दलाचा एक अत्यंत निष्ठावान आणि दक्ष सदस्य आज काळाच्या पडद्याआड गेला. गेल्या सहा वर्षांपासून अनेक गुन्ह्यांच्या तपासात मोलाचा वाटा उचलणारा डॉबरमन जातीचा श्वान ‘कुपर’ याने ह्रदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. या दु:खद घटनेने संपूर्ण पोलिस विभाग हळहळला आहे. पोलिस मुख्यालयात साग्रसंगीत शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या प्रमुख हस्तक अंमलदार शबाना अत्तार यांच्या हुंदक्यांनी वातावरण पिळवटून टाकले होते.
गुन्हे उकलण्याचा कसदार अनुभव
६ ऑगस्ट २०१९ रोजी जन्मलेला कुपर पुण्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात २०२० मध्ये कठोर प्रशिक्षण पूर्ण करून सांगली पोलिस दलात दाखल झाला. त्याच्या सेवाकाळात त्याने ३६० हून अधिक घटनास्थळी भेट दिली, त्यातील शेकडो गुन्ह्यांच्या तपासाला निर्णायक वळण दिले. २०२१ मधील जत खून प्रकरण, २०२२ मधील हरीपूर हत्या, तसेच आटपाडीतील घरफोडी प्रकरणात कुपरने पोलिसांना महत्त्वपूर्ण संकेत दिले. त्या आधारे पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
कुपरची कार्यतत्परता नेहमीच वाखाणली गेली
त्याच्या विशिष्ट कार्यक्षमतेमुळे तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे आणि पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून त्याचा सत्कार करण्यात आला होता. पोलिस खात्यात तो केवळ एक श्वान नव्हता, तर खऱ्या अर्थाने सहकारी होता, सहकाऱ्यांमध्ये त्याचं विशेष स्थान होतं.
भावनिक नाते आणि अंत्यवेला अश्रूंची साक्ष
शबाना अत्तार या श्वान दस्त्याच्या महिला अंमलदारांनी पिल्लू असतानाच कुपरला आपल्या ताब्यात घेतले. दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी त्याच्याशी एक अतूट नातं निर्माण केलं. कुपरच्या खाण्यापिण्यापासून प्रत्येक गरजेची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या हृदयाशी जपली. आज त्याने अचानकच साथ सोडल्यावर त्या अक्षरशः कोसळल्या. डॉक्टरांनी मृत्यू जाहीर करताच त्यांचे अश्रू थांबेनात.
पोलिस दलाने दिली अखेरची मानवंदना
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुपरला श्रद्धांजली अर्पण केली. बंदुकीच्या फैरी झाडून अधिकृत सन्मानाने त्याला निरोप देण्यात आला. उपस्थित सर्वांचा डोळे पाणावले.
'कुपर' गेला... पण त्याच्या निष्ठा, कर्तृत्व आणि सहवासाच्या आठवणी कायमस्वरूपी सांगली पोलिस दलाच्या इतिहासात कोरल्या गेल्या.