| सांगली समाचार वृत्त |
डोंबिवली - बुधवार दि. ९ जुलै २०२५
रिजन्सी अनंतम् डोंबिवली पूर्व येथील रहिवासी संकुलात रविवार ६ तारखेला आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली दिवसभर नियोजनबद्ध पद्धतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राधा कृष्ण मंदिर सेवा संस्था,उत्सव मंडळ, महिला व पुरुष भजनी मंडळ, लावण्यवती महिला मंडळ, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. सकाळी आठ वाजता पांडुरंगाला अभिषेक वृंदा पूजनाने उत्सवाला सुरुवात झाली. संकुलातील सर्वांनी विठू माऊलीच्या पालखीबरोबर पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग, भजने गात, नामस्मरण करीत, भगवंताचा, माऊलीचा जय घोष करीत, ध्वज पताका नाचवत, पारंपरिक वेशभूषा करून खेळ खेळत, दिंडीला उत्तम प्रतिसाद दिला.
पारंपरिक वेशभूषा केलेल्या बाल गोपाला सह जास्तीत जास्त संख्येने भक्तगण दिंडीत सहभागी झाले होते.त्यानंतर मंदिरात तुलशी वृंदावनाची स्थापना करण्यात आली. रिजन्सी अनंतम् क्रिकेट मित्रमंडळ सारख्या अनेक दानशूर व्यक्तींनी संकुलातील सर्व भाविकांसाठी उपवासाच्या प्रसादाची संपूर्ण दिवसभरासाठीची व्यवस्था करून खूप मोठा हातभार लावला.
दुपारी चार वाजल्या पासून संवादिनी, मृदुंग, तबला,ढोलकी, टाळ, टाळ्या वाजवत श्री राधाकृष्ण मंदिरात देवासमोर बसून स्वरगंध महिला भजनी मंडळ, राधाकृष्ण महिला भजनी मंडळ, हम साथ साथ हैं महिला भजनी मंडळ, श्री राधा कृष्ण प्रासादिक भजनी मंडळ या सर्वांनी अतिशय सुंदर भजन गायले. दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक त्यांच्या बरोबर भजनात सहभागी होत होता. अशाप्रकारे श्रद्धेच्या महासागरात, भक्तांच्या अपार सहभागातून आणि विठुमाऊलीच्या अखंड गजरात या आषाढी एकादशीला प्रत्येक भाविक मनोभावे नतमस्तक होऊन आपले दुःख,चिंता विसरून मगन कीर्तनात विलीन झाला होता.
बातमी सौजन्य : विद्या कुलकर्णी (डोंबिवली)