| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. १७ जुलै २०२५
मिरज-सांगली मार्गाच्या अनावश्यक डांबरीकरणावर वर्षभरापासून सातत्याने आवाज उठवत असलेल्या मिरज सुधार समितीच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी विधान भवनात लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने अखेर चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे.
या रस्त्यावर महात्मा गांधी चौक ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक (सांगली) या सुमारे १० किलोमीटर अंतराच्या भागात, रस्ता आधीच चांगल्या स्थितीत असताना नव्याने डांबरीकरण करत सुमारे २९ कोटी रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आल्याची तक्रार सुधार समितीने ३० मे २०२४ रोजी अधिकृतरीत्या नोंदवली होती. या अनियमिततेची गंभीर दखल घेत समितीने राज्यस्तरीय अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधींपर्यंत विविध स्तरांवर पाठपुरावा केला.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत वेळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, या प्रकरणात मिरज-सांगलीचे स्थानिक आमदार शांत राहिल्याची नाराजीही व्यक्त झाली.
शेवटी आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत या विषयाची ठळकपणे मांडणी केली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारला जाग येत, या कामाच्या चौकशीसाठी अधिकृत समितीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
मिरज सुधार समितीचे प्रमुख ऍड. ए. ए. काझी यांनी याबद्दल आमदार खोत यांचे आभार मानत, चौकशी समितीसमोर सर्व आवश्यक पुरावे सादर करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, असिफ निपाणीकर, रविंद्र बनसोडे, दिनेश तामगावे आदी सदस्य उपस्थित होते.
सुधार समितीने या चौकशी प्रक्रियेत संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.