| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २८ जुलै २०२५
२७ जुलै १९३५ – सांगलीच्या व्यापारी इतिहासातील एक निर्णायक आणि स्वाभिमानदायक क्षण ! त्या ऐतिहासिक घटनेला ९० वर्षे पूर्ण होत आहेत, जेव्हा एक अभ्यासू आणि मुत्सद्दी नेता, दि. ब. लठ्ठे यांनी आपली मध्यस्थी करून सांगलीतील व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले अन्यायकारक 'मार्केट अॅक्ट' मागे घेण्यास सांगली दरबाराला भाग पाडले.
त्या काळात सांगली संस्थानच्या रयत असेंब्लीत १९३४ मध्ये मंजूर झालेला 'मार्केट अॅक्ट' व्यापाऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरला होता. दरबारच्या नोकरशाहीने या कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्यावर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला. व्यापार उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी व्यवसाय स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि बुधगावजवळ नवीन व्यापारी वसाहतीची उभारणी सुरू केली. या वसाहतीला राजेसाहेबांच्या नावावरून ‘माधवनगर’ असे नाव देण्यात आले.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत आपल्या मागण्या दरबाराकडे मांडल्या, पण त्याची दखल घेतली गेली नाही. या कठीण प्रसंगी लठ्ठे साहेबांची आठवण झाली. त्या वर्षी मिरजेतील दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनात त्यांनी व्यापाऱ्यांना उद्योगवृद्धीचे दिशा-दर्शन दिले होते. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली.
लठ्ठे साहेबांनी संपूर्ण कायद्याचा सखोल अभ्यास करून, त्यातील अडथळे आणि दडपशाहीची मुद्देसूद मांडणी राजेसाहेबांसमोर केली. त्यांच्या प्रभावी विवेचनाने दरबाराला या कायद्याचा प्रत्यक्ष दुष्परिणाम समजला. राजेसाहेबांनी लठ्ठे यांना मध्यस्थीचे आमंत्रण दिले आणि त्यांच्या शिफारशी मान्य करत अखेर २७ जुलै १९३५ रोजी राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये हा कायदा अधिकृतरीत्या मागे घेण्यात आला.या ऐतिहासिक निर्णया नंतर सांगली चेंबर ऑफ कॉमर्सने राजेसाहेबांचा सन्मान केला, तर लठ्ठे साहेबांच्या दूरदृष्टीचेही कौतुक करत त्यांच्या योगदानाची अधिकृत नोंद वार्षिक अहवालात केली.
आजच्या काळात, जेव्हा व्यापाराच्या क्षेत्रात पुन्हा एकदा आव्हाने उभी राहत आहेत, तेव्हा लठ्ठे साहेबांचे योगदान नव्या पिढीच्या व्यापाऱ्यांनी ओळखले पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांचे संरक्षण हे समाजहिताचेच प्रतीक होते, याचा विसर पडता कामा नये.
—
प्रा. एन. डी. बिरनाळे,
सांगली.