| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २८ जुलै २०२५
सांगलीपासून ६० किमी आणि कोल्हापूरपासून अवघ्या ४५ किमी अंतरावर वसलेले बत्तीसशिराळा गाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक अनोखा ठसा उमटवते. हजारो वर्षांपासून येथे साजरा होणारा नागपंचमीचा पारंपरिक उत्सव या गावाची अस्मिता आहे. 'करवीरमाहात्म्य', 'पद्मपुराण' आणि 'नाथ लीलामृत' यांसारख्या पौराणिक ग्रंथांत या परंपरेचा उल्लेख सापडतो. या परंपरेत जिवंत नागांची पूजा हा मुख्य भाग असला, तरी २००२ पासून यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली. त्यामुळे आज फक्त प्रतीकात्मक पूजाच उरली आहे.
विदेशी पाहुण्यांनाही आकर्षित करणारा हा उत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून, जैवविविधतेचा आणि श्रद्धेचा संगम मानला जातो. बंदी उठवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक संस्था आणि व्यक्तींनी लढा दिला आहे. विधिमंडळातही हा प्रश्न ऐरणीवर आणला गेला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात सकारात्मक पावले उचलण्याची ग्वाही दिली आहे.
शिराळ्याचा इतिहास समृद्ध आहे. या गावाचे मूळ नाव ‘श्रीआलय’ – म्हणजे लक्ष्मीदेवीचे निवासस्थान. अंबामाता येथे अत्यंत पुरातन मंदिरात विराजमान आहे. लोककथेनुसार, गोरक्षनाथ अंबामातेच्या सेवेसाठी येथे येत असत. गोरक्षनाथांनीच नागपूजेची परंपरा इथे सुरू केली, असे मानले जाते. महाजन कुटुंबीयांच्या घरी एकदा भिक्षा मागायला आले असताना त्यांनी आपल्या सिद्धीतून जिवंत नाग प्रकट करून 'येथे नागांची पूजा होईल, आणि नाग कुणालाही त्रास देणार नाहीत', असे वचन दिले.
नागपंचमीला येथील महाजन कुटुंबातील लोक देवीची मूर्ती सजवून पालखीतून मिरवणूक काढतात. गुरव समाज आणि १२ बलुतेदारही या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. अंबामाता, मरीमाई, वज्रेश्वरी आदी मंदिरांना भेट दिल्यानंतर परतीचा प्रवास होतो. कोतवाल कुटुंबीयांना मानाचा नाग पूजनाचा मान आहे, तर इतर मंडळांकडून पंचधातू व मातीचे नाग पूजले जातात.
शिराळ्यातील अंबामातेचे मंदिर विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे – येथे कमळावर बसलेली मूर्ती असून ती अत्यंत जागृत मानली जाते. या परिसरात संत रामदासस्वामी, संत निवृत्तीनाथ आणि जंगली महाराज यांसारख्या संतांनीही वावर केला. येथे रामदासस्वामींनी स्थापन केलेले मारुती मंदिर असून त्याचेही भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे.गोरक्षनाथांनी येथे 'गोरक्ष चिंच' नावाचे औषधी झाड लावले होते. आजही येथे १०८ प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रत्येक १२ वर्षांनी नाथपंथीय साधू येथे झुंडीने येतात आणि नवा मठाधिपती नियुक्त होतो. अनेक सिद्ध साधूंच्या समाधीही या मठ परिसरात आहेत, ज्यांना लोक अदृश्य स्वरूपात येथे वास करत असल्याचे मानतात.पूर्वी नागपंचमीच्या एक महिना आधीपासून नागमंडळे जंगलात जाऊन नाग पकडत असत. नागपंचमीच्या दिवशी सुमारे १००-१२५ नागांची मिरवणूक निघत असे, ज्यात विशेष नागांना पारितोषिके दिली जात. सध्या ही परंपरा बंद असून केवळ पुतळ्यांची मिरवणूक काढली जाते.
स्थानिक आमदार सत्यजित देशमुख, नागपूजेच्या परंपरेसाठी सातत्याने विधिमंडळात आवाज उठवत आहेत. जनतेच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी आणि घटनात्मक अधिकारांच्या आधारे या परंपरेला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मागणीला २०१५ पासून स्थानिक स्तरावर आंदोलने, उपोषणेही करण्यात आली आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही पूजा बंद करण्यात आली असली, तरी हिंदू परंपरेत प्राण्यांची पूजा ही धार्मिक आस्था आहे. अशा श्रद्धास्थानांवर घालण्यात आलेली बंदी ही केवळ कायद्याची मर्यादा नाही, तर सांस्कृतिक हानीही आहे. त्यामुळे या कायद्यात योग्य बदल होणे गरजेचे आहे, असा ठाम सूर आज उभरून आला आहे.
बत्तीसशिराळा हे केवळ गाव नाही, तर हजारो वर्षांची श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृती यांचे प्रतीक आहे. नागपंचमीचा हा उत्सव पुन्हा आपल्या पूर्ण तेजात सुरू व्हावा, हीच येथील जनतेची एकमुखी मागणी आहे.
अशोक डोंगरे,
सांगली.