| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २८ जुलै २०२५
कुपवाड औद्योगिक वसाहतीतील ‘इंडोटेक्स एक्स्पोर्ट’ या जीन्स कापड उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या संचालिका ममता राजेंद्रकुमार बाफना यांची तब्बल १९ लाख ६४ हजार ४०१ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील सागर नारायणदास केसवाणी (वय ३५) या व्यापाऱ्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ममता बाफना यांच्या ‘इंडोटेक्स एक्स्पोर्ट’ कंपनीने जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ दरम्यान उल्हासनगरच्या ‘चिराग प्रेल्स’ या फर्मला तयार जीन्स कापड पुरवले होते. सागर केसवाणी याने विविध वेळी ऑर्डर देऊन एकूण २७ लाख २९ हजार ८६२ रुपयांचा माल खरेदी केला, परंतु त्यामध्ये फक्त ७ लाख ६५ हजार ४६१ रुपये अदा केले. उर्वरित रक्कम लवकरच देतो, असे सांगून त्याने वेळकाढूपणा केला आणि उर्वरित पैसे देण्यास नकार दिला.
वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने अखेर ममता बाफना यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर सागर केसवाणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.