| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २८ जुलै २०२५
वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड येथे शनिवारी रात्री पोलिसांवर कोयत्याने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. "पोलिसांना जिवंत सोडायचं नाही, गोळ्याच झाडा!" अशी उघड धमकी देत काही स्थानिक गुंडांनी ही हिंसक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन पोलिस जखमी झाले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
अतुल शंकर साळुंखे (२९), ओंकार मोहन कदम (२७), कांचन शंकर साळुंखे (५५) आणि मयुरी अतुल साळुंखे (२३, सर्व रा. किल्लेमच्छिंद्रगड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हल्ल्यात पोलिस कर्मचारी आकाश सावंत आणि जालिंदर माने यांना गंभीर दुखापत झाली आहे.
इस्लामपूर पोलीस गस्त पथक बहे, नरसिंहपूर आणि किल्लेमच्छिंद्रगड भागात गस्त घालत होते. त्याच दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून पोलीसांकडे आले आणि विजय साळुंखे व ओंकार कदम या दोघांनी त्यांच्या वडिलांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली.
पोलीस तात्काळ किल्लेमच्छिंद्रगड येथे पोहोचले. विजय साळुंखेच्या घराजवळ असलेला अतुल साळुंखे हा दुचाकीवर ऊसतोडीचा कोयता ठेवून उभा होता. पोलीस त्याला चौकशीसाठी बोलावू लागले असताना त्याने थेट फोनवर साथीदाराला सांगितले – "पिस्तूल घेऊन ये, पोलिसांचा शेवट करायचा आहे!"थोड्याच वेळात बोलेरो गाडीतून एक व्यक्ती धडाक्यात घटनास्थळी पोहोचला आणि पोलिसांना शिवीगाळ करत थेट अंगावर चालून गेला. या गोंधळात अतुलने कोयत्याने पोलीस जालिंदर माने यांच्यावर वार केला, तर आकाश सावंत यांना देखील मारहाण करण्यात आली. ओंकारनेही हातात कोयता घेऊन हल्ला केला. महिलांनी दगडफेक करत परिस्थिती अधिकच गंभीर केली.
या हल्ल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. झटपट कारवाई करत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आणि त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता चौघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
गुन्हेगारीचा नवा अड्डा : किल्लेमच्छिंद्रगड
सांगली जिल्ह्यातील किल्लेमच्छिंद्रगड हे गाव गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट होत आहे. कराड व इस्लामपूर पोलीस ठाण्यांच्या सीमारेषेवर असल्याने गुन्हेगारांना याठिकाणी मुक्त वावर मिळतो. गांजाची तस्करी, बेकायदेशीर शस्त्र व्यवहार, मोटरसायकल चोरी यामुळे परिसरात दहशत आहे. रात्रीच्या वेळी या भागातील खिंडीतून जाणं धोकादायक ठरत आहे. पोलीस यंत्रणांची प्रभावी उपस्थिती नसल्याने गुन्हेगारांची मजल वाढत आहे.