| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ५ जुलै २०२५
सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचे वातावरण तापत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी अधिकच गडद होताना दिसत आहे. खास करून सांगलीत, जिथे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो, तिथेच अजित पवार गटाने जोरदार घुसखोरी करत सत्तासमीकरणांची समीकरणं बदलण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवार यांच्या गटात सामील झाल्यानंतर निशिकांत पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात नवे केंद्रबिंदू बनले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच जयंत पाटलांना थेट आव्हान दिलं. ऊस बिले, शासकीय निर्णयांवरील टीका अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी जयंत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला.
आजघडीला सांगली जिल्ह्यातील राजकीय सूत्रं निशिकांत पाटील यांच्या हातात केंद्रित झाली आहेत. जिल्हाभर दौरे, फेसबुकवरून सक्रियता, पक्षबांधणीसाठी नेत्या-पदाधिकाऱ्यांचा ओढा — हे सारे त्यांचं वर्चस्व अधिकच अधोरेखित करत आहे. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राजेंद्रआण्णा देशमुख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या प्रवेशानंतर शिवाजीराव नाईक यांच्याकडे उपप्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि संजयकाका पाटील हेही या गटाशी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे, भाजपमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्याने निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघटना अधिकच मजबूत झाली आहे.
ही वाढती ताकद आता जयंत पाटील यांच्या गटासाठी डोकेदुखी ठरत आहे. शिराळ्यात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासमोर शिवाजीराव नाईक घरातूनच आव्हान उभं करत आहेत. तसेच, जयंत पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजे इस्लामपूरमध्ये, निशिकांत पाटलांनी मताधिक्य कमी करत प्रभावशाली नॅरेटिव्ह तयार केलं आहे.
आता त्यांचं पुढचं लक्ष तासगाव-कवठेमहांकाळमध्ये संजयकाका आणि घोरपडे यांना सक्रिय करण्यावर आहे, तर शहरी भागांत इद्रीस नायकवडी यांच्या रूपाने अजित पवार गटाची पाळंमुळं घट्ट होत चालली आहेत.
शरद पवार गटात जयंत पाटील, युवा आमदार रोहित पाटील, आणि मानसिंगराव नाईक यांच्यासह मोठं कार्यकर्त्यांचं जाळं असून, अनेक जण शरद पवार यांचं नावच हक्काने पुढे नेत आहेत. मात्र, सध्या परिस्थिती पाहता सांगलीत अजित पवार गट आघाडीवर जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने येणार असून, लढत अतिशय चुरशीची होणार हे निश्चित!