yuva MAharashtra पत्रकारिता पदवीकडे तरुणांचा ओढा कमी होतोय : एक काळजीकारक वास्तव - एस. एम. देशमुख

पत्रकारिता पदवीकडे तरुणांचा ओढा कमी होतोय : एक काळजीकारक वास्तव - एस. एम. देशमुख


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. ५ जुलै २०२५

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात यंदा एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. ही घटना ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाच्या सद्यस्थितीकडे पाहिल्यास हे चित्र अनपेक्षित नाही. राज्यभरात मिळून सुमारे ३ हजार जागा असतानाही त्यातील फारतर १० टक्के जागाच भरल्या जात आहेत — उर्वरित रिकाम्याच.

एक काळ होता, जेव्हा पत्रकार बनण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन तरुण वर्ग या अभ्यासक्रमाकडे आकर्षित व्हायचा. आठवते, १९८३ मध्ये मी स्वतः मराठवाडा विद्यापीठाच्या बीजे अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता, पण ३० पैकी एकही जागा माझ्या नशिबी आली नाही. पुढच्या वर्षी संधी मिळाली आणि अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या वेळी पत्रकारितेला असलेला मान आणि ओढ आज मात्र कुठेच दिसत नाही.

पूर्वी जिल्हास्तरावर, अगदी अलिबागसारख्या ठिकाणीही, पत्रकार संघामार्फत चालवले जाणारे अभ्यासक्रम २५-३० विद्यार्थ्यांनी सहज भरायचे. आज मात्र ही संख्या शून्यावर येऊन पोहोचली आहे. यामागची कारणं अनेक आहेत.

सर्वप्रथम, बीजे केल्यानंतर नोकरी मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये तंत्रज्ञानाने मानवशक्तीची गरज कमी केली आहे. माहिती व जनसंपर्क खात्यांतील संधीही कमी झाल्यामुळे अभ्यासक्रमानंतर रोजगाराची निश्चित दिशा उरलेली नाही. परिणामी एक वर्ष ‘वाया’ जाईल या भीतीने अनेकजण हा अभ्यासक्रम टाळतात.

जे थोडेबहुत काम मिळतं, त्यातही स्थिरता नाही आणि वेतन इतकं अल्प असतं की ते टिकून राहणं कठीण. माध्यम संस्थांचं शोषण, पत्रकारांवरील अन्याय आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळेही या क्षेत्राकडे वळण्याचा उमेद गमावतो.

सरकारच्या विविध आयोगांच्या शिफारसी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय — हे सगळं कागदोपत्रीच राहिलं. प्रत्यक्षात, बहुतेक मीडिया संस्थांनी त्या शिफारशी अमलात आणलेल्या नाहीत. यामुळे पत्रकारांचे वेतन प्रश्नात आहे, आणि संघटितपणे आवाज उठवणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.

पूर्वी काही तरुण ‘व्यवस्था बदलायची’ ही ध्येयनिष्ठ भावना बाळगून पत्रकारितेकडे वळायचे. पण आज बहुसंख्य माध्यमसंस्थांनीच व्यवस्थेला शरण गेल्यामुळे, ‘बदल घडवण्याचं माध्यम’ म्हणून पत्रकारिता हा पर्याय विश्वासार्ह राहिलेला नाही.

आजची ही स्थिती केवळ शिक्षणसंस्थांसाठीच नव्हे, तर लोकशाहीसाठीही गंभीर इशारा आहे. कारण चांगले, निडर पत्रकार तयार झाले नाहीत, तर सामान्यांची व्यथा मांडणारा, प्रश्न विचारणारा आवाजच हरवेल.