yuva MAharashtra सांगलीच्या सरकारी रुग्णालयासाठी १५ कोटींच्या निधीची मागणी — आमदार सुधीर गाडगीळांचा आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा

सांगलीच्या सरकारी रुग्णालयासाठी १५ कोटींच्या निधीची मागणी — आमदार सुधीर गाडगीळांचा आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. ५ जुलै २०२५

सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सांगली येथील वसंतराव पाटील शासकीय रुग्णालयासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो रुग्ण दररोज या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र, अद्यापही रुग्णालयात अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती आमदार गाडगीळ यांनी यावेळी दिली.

रुग्णालयाच्या एकूणच पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी खालील कामांसाठी निधीची मागणी केली आहे: कंपाऊंड वॉलचे बांधकाम, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, प्रवेशद्वाराचे उभारणी, नवीन निवासी वसतिगृह, धोंडीराज बंगल्याचा विकास, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, वाहनतळाची सुविधा आणि औषध साठवणूक शेड उभारणे.

या कामांसाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केले असून, आता लवकरच त्याला अर्थसहाय्य मिळावे यासाठी गाडगीळ यांनी आरोग्य मंत्र्यांकडे जोरदार मागणी केली आहे. अपेक्षा आहे की लवकरच या कामांना गती मिळून रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम आणि सुसज्ज होतील.