yuva MAharashtra राज ठाकरेंच्या घातपाताचा होता प्लॅन...?'; बड्या नेत्याच्या दाव्यानं महाराष्ट्रात खळबळ

राज ठाकरेंच्या घातपाताचा होता प्लॅन...?'; बड्या नेत्याच्या दाव्यानं महाराष्ट्रात खळबळ


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. ३ जुलै २०२५

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठाकरे बंधू – उद्धव आणि राज ठाकरेंभोवती फिरताना दिसत आहे. दररोज चर्चेचे नवनवे बॉम्ब फुटत आहेत... असाच एक बॉम्ब शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी फोडल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. महायुती सरकारने घेतलेल्या हिंदीप्रेमी निर्णयामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे पुन्हा जवळ येण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत. येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यात हे दोन्ही नेते एकत्र मंचावर येणार आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी खळबळजनक दावे करून चर्चेला नवी दिशा दिली आहे.

रामदास कदम यांनी ठामपणे सांगितले की, जर राज आणि उद्धव पुन्हा एकत्र आले, तर त्यात सर्वांत मोठी राजकीय किंमत राज ठाकरेंनाच मोजावी लागेल. त्यांनी हा दावा करताना उद्धव ठाकरेंच्या पूर्वीच्या भूमिका आठविल्या. राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना उद्धव यांनी ‘एका म्यानात दोन तलवारी नकोत’ असे म्हणत नकार दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कदम यांनी पुढे बोलताना एकेक करून अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला. आदित्य ठाकरेंना निवडून देण्यासाठी राज ठाकरे यांनी मदत केली, पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याचा सन्मान केला का? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय, उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला राज यांना निमंत्रण दिलं, पण व्यासपीठावर बसायला जागा न दिल्याचा आरोपही त्यांनी केला. “राज ठाकरेंचा अपमान करण्यासाठीच त्यांना बोलावलं गेलं होतं का?” असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला.

यावेळी कदम यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट करत दावा केला की, राज ठाकरे यांच्यावर घातपात करण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता. ते म्हणाले की, कणकवली दौऱ्यावेळी अचानक मार्ग बदलावा लागला आणि मुंबईत परतण्याचे आदेश मिळाले. या प्रकाराची सविस्तर माहिती खुद्द राज ठाकरेंनाच विचारा, असंही त्यांनी सुचवलं.

महाबळेश्वरमध्ये शिवसेना कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंची निवड झाली असती तर मराठी जनतेचं अधिक कल्याण झालं असतं, असा दावाही त्यांनी केला. मातोश्रीवरून प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रस्ताव बारगळला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

कदम यांनी शिवसेनेत घडलेल्या घटनांची उजळणी करत उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले. "मनसेचे नगरसेवक फोडणं, राज यांच्या मुलाला निवडणुकीत हरवणं, हे मराठी माणसाच्या हिताचं नव्हतं," असे ते म्हणाले. तरीही राज ठाकरे हे आपले जुने आणि चांगले मित्र आहेत, असं सांगून त्यांनी आपलं नातं अधोरेखित केलं.

शेवटी, आपल्या नेहमीच्या परखड शैलीत कदम यांनी ठाकरेंवर आरोप केला की, त्यांनी अनेक निष्ठावान नेत्यांचा वापर करून त्यांना नंतर बाजूला सारले. “मी, दिवाकर रावते, लीलाधर ढाके – अशा कित्येकांना उद्धव ठाकरेंनी वापरून टाकलं,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला.

अर्थात रामदास कदम यांचे हे आरोप नवे नाहीत. आतापर्यंत त्यांनी याविषयी अनेकदा हे आरोप केले आहेत. त्यामुळेच आताचे हे आरोप म्हणजे शिळ्या कडीला नव्याने फोडणी टाकण्याचा प्रकार असून, आमच्या लेखी या आरोपांना शुन्य किंमत असल्याची टीका उबाठाच्या एका वरिष्ठ नेत्याने केली आहे.