| सांगली समाचार वृत्त |
विटा - शुक्रवार दि. ३ जुलै २०२५
सांगलीच्या विटा शहरात पार पडलेल्या ‘युवा संवाद मेळावा’त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी थेट माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेच्या वेळी इस्लामपूर मतदारसंघाची संधी हुकल्याची आठवण करून देत, त्यांनी सूचक इशारा दिला की पुढच्या वेळी कोणालाही सुट्टी नाही!
या मेळाव्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाने आपली संघटनशक्ती आणि तरुण कार्यकर्त्यांचे एकात्मिक नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन देशमुख आणि अनिल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पैलवान सत्यजित पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, याच दिवशी सुरज चव्हाण यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.
"दादांवर टीका करणाऱ्याची पात्रता काय?"
आपल्या भाषणात सुरज चव्हाण यांनी पक्षातील हालचाली, सोडून गेलेली मंडळी आणि अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की लोकसभा निकालानंतर काहींनी गृहित धरले की पक्ष संपणार आहे, पण खरा नेतृत्वदाखवणारा नेता कोण हे जनतेने ४२ आमदार निवडून देऊन दाखवून दिले. "