| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ९ जुलै २०२५
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक घडी पूर्णतः सुदृढ असून, काही दिवसांपासून उठणाऱ्या संभ्रमात्मक चर्चांना सामोरे जात संस्थेच्या संचालक मंडळाने स्पष्टता आणली आहे. संस्थेच्या संचालिका श्रीमती भारती चोपडे यांनी यासंदर्भातील माहिती पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात नमूद केल्यानुसार, संस्थेविषयी पसरत असलेल्या काही चर्चांचा गांभीर्याने विचार करून, संपूर्ण संचालक मंडळाने संयुक्त बैठक घेऊन तक्रारदारांशी संवाद साधला. त्यांच्या शंका समजून घेऊन समर्पक स्पष्टीकरण देण्यात आले.
"संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत कुठलाही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सर्व संचालक एकमताने खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, संस्थेची आर्थिक घडी अतिशय मजबूत आहे. आमच्या कडे ठेवलेला प्रत्येक सभासद आणि ठेवीदारांचा पैसा पूर्णतः सुरक्षित आहे," अशी ठाम ग्वाही श्रीमती चोपडे यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी असेही नमूद केले की, सोशल मीडियावर अथवा अन्य माध्यमांतून पसरवले जाणारे अपप्रचार अथवा अफवा यांना कोणीही बळी पडू नये.
"संस्थेप्रती आजवर दाखवलेला विश्वास आणि प्रेम यापुढेही कायम राखण्याचे आवाहन आम्ही सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांना करत आहोत," अशी विनंती करत संस्थेच्या स्थैर्याबाबत कुठलीही शंका मनात ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.