| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. १५ जुलै २०२५
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून सुरू असलेल्या वादाला अखेर सुप्रीम कोर्टात काहीशी गती मिळाली आहे. सोमवारी या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी झाली असून, न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणी घेण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना "शिवसेना" हे पक्षनाम आणि "धनुष्यबाण" हे चिन्ह वापरण्यापासून थांबवावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने ही मागणी आक्रमकपणे मांडली आहे.
ठाकरे यांच्या वकिलांनी २ जुलै रोजी या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावर आज थोडक्यात चर्चा झाली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी "हे प्रकरण आम्हाला संपवायचं आहे," असे स्पष्ट करत ऑगस्ट महिन्यातच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले. मात्र, अद्याप नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये केलेल्या बंडखोरीनंतर, फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्याच गटाला "शिवसेना" हे नाव आणि "धनुष्यबाण" हे चिन्ह बहाल केले होते. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून, त्यावर अद्याप अंतिम निर्णय लागलेला नाही.
सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मात्र, खरा निकाल स्थानिक निवडणुकीआधीच जाहीर झाला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव निर्माण होऊ शकतो.