yuva MAharashtra जयंत पाटील यांचा भाजप प्रवेशाचा चर्चांवर स्पष्टवक्तेपणा : "मी आजही प्रदेशाध्यक्ष आहे"

जयंत पाटील यांचा भाजप प्रवेशाचा चर्चांवर स्पष्टवक्तेपणा : "मी आजही प्रदेशाध्यक्ष आहे"

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. १५ जुलै २०२५

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांच्या संभाव्य राजीनाम्याची आणि भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही वृत्तांतांनुसार, त्यांनी भाजप नेत्यांशी दोन वेळा गुप्त बैठकाही घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांना अपेक्षित मंत्रिपद न मिळाल्यामुळे हा प्रवेश तात्पुरता थांबवण्यात आल्याची चर्चा होती.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी अखेर स्वतःच या चर्चांवर पडदा टाकत स्पष्ट भूमिका मांडली आहे. “ना भाजपकडून मला आमंत्रण आलंय, ना मी तिथे जाण्याची इच्छा दर्शवली आहे. एखाद्या प्रदेशाध्यक्षाबाबत अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू होणं दुर्दैवी आहे. मी कुणालाही विनंती केलेली नाही, कुणाशीही सौदेबाजी केलेली नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

राजकीय गॉसिप आणि अपप्रचारांना उत्तर देताना त्यांनी असंही नमूद केलं की, “कोणी कोणाला भेटलं तरी लगेच त्यातून राजकीय अर्थ काढले जातात. मात्र, अशा बातम्यांमागे कोणताही आधार नाही. मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा प्रदेशाध्यक्ष आहे आणि पक्षासाठी काम करत आहे.”

शरद पवार यांच्या नेतृत्वाविषयी त्यांनी आपली निष्ठा अधोरेखित करत म्हणाले की, “पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. पक्षाच्या स्थापनेपासून मी या विचारसरणीशी बांधील आहे.”

१० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी अध्यक्षपद नवे नेतृत्व घेण्याच्या दिशेने इशारा दिला होता. शरद पवार यांनीही त्यावेळी त्यांच्या या भूमिकेची सकारात्मक दखल घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा उफाळून आली होती. शनिवारी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना अधिक गती मिळाली होती. अखेर स्वतः जयंत पाटील यांनीच पुढे येऊन आपण अद्यापही प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत असल्याची ठाम घोषणा केली.