| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - बुधवार दि. १६ जुलै २०२५
महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एका धक्कादायक खुलाशाने खळबळ माजवली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या खासगी टिपण्णीतून एक गंभीर शक्यता समोर आली आहे — राज्यातील ७० हून अधिक वरिष्ठ अधिकारी आणि काही माजी व सध्याचे मंत्री 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अडकले असण्याची माहिती पुढे आली आहे.
हा प्रकार केवळ हनी ट्रॅपपुरता मर्यादित आहे की यामध्ये अनैतिक संबंधांचा मोठा खेळ आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या चर्चेमुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. विशेषतः नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने अधिक गोंधळ निर्माण केला आहे.
या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचा थेट सहभाग असल्याची जोरदार चर्चा असून, या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्याचे समजते. अधिकाऱ्यांचे आणि काही नेत्यांचे अश्लील व्हिडिओ असल्याचा आरोप असून, त्यामुळे कोणीही उघडपणे पुढे येण्यास तयार नाही. परिणामी, सारा प्रकार अद्याप अंधारातच आहे.
राज्यात अधिकाऱ्यामध्ये भीतीचं वातावरणया प्रकरणाची व्याप्ती नाशिकपुरतीच मर्यादित नसून, मुंबई आणि पुणे येथील काही वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेतेही संशयाच्या छायेत आहेत. एका नामवंत नेत्याने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे, अनेकांची अवस्था तोंडात बोट घालण्यासारखी झाली आहे. हनी ट्रॅपचा फास कोणाच्या गळ्यात अडकला आहे, याची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरी, संबंधितांचे नावे बाहेर पडल्यास मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हं आहेत.
व्हिडिओ फुटेजमुळे गुप्तता आणि गोंधळ
संबंधित व्हिडिओ फुटेजमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनले आहे. हे क्लिप्स जर बाहेर आल्या, तर अनेकांचा समाजातील आणि सत्तेतील चेहरा उघड होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रकरण झाकण्याचेही प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मोठं षडयंत्र की वैयक्तिक पातळीवरचे प्रकरण?
या संपूर्ण प्रकारामागे केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा बिघडलेला वापर आहे की राजकीय व प्रशासकीय यंत्रणांमध्ये घातपाती कारस्थान सुरु आहे, याचाही शोध सुरू झाला आहे. सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. पण हे प्रकरण जसे पुढे उघड होईल, तसतसे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.