| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. १६ जुलै २०२५
"वीर सेवा दलाच्या वीराचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कार्य हे केवळ प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित नसून, ते युवकांना आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे," असे मत ख्यातीस पावलेले विचारवंत आणि वाणीभूषण प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी व्यक्त केले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केले.
सांगली येथील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य सुदर्शन पाटील होते.
प्रा. बिरनाळे म्हणाले की, औद्योगिक युगात आज शिक्षणाबरोबरच व्यावसायिक आणि संवादकौशल्य, समस्या हाताळण्याची क्षमता, संघभावना आणि उद्योजकतेचा दृष्टिकोन यांचा समावेश आवश्यक झाला आहे. "कुशल युवक हीच राष्ट्रनिर्मितीची खरी पायाभरणी असून, हे युवकच देशाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे शिल्पकार ठरतात," असे ते म्हणाले.संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१४ साली १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जाहीर केला. या घोषणेमागील उद्देश म्हणजे युवा पिढीला आधुनिक युगाच्या गरजेनुसार तयार करणे. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवउद्योग, नवोपक्रम आणि डिजिटल युगातील संधींना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक आणि जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करणे अनिवार्य ठरले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
"वीराचार्य आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिकल ड्राफ्ट्समनसारख्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून केवळ शिस्तबद्ध शिक्षणच नव्हे, तर व्यावहारिक अनुभवही दिला जातो," असे सांगून त्यांनी संस्थेचे कौतुक केले.
प्राचार्य सुदर्शन पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "कौशल्यसंपन्न युवक हेच उद्याचे यशस्वी उद्योजक किंवा तंत्रज्ञ असतात. संस्थेचा उद्देश केवळ नोकरी देणारा नाही, तर नोकरीसाठी सज्ज करणारा आहे." त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटीने अभ्यास करून उज्वल भविष्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात व समारोप णमोकार मंत्राने करण्यात आली. प्रारंभी वाडकर सरांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रस्ताविक केले. प्रा. खोत यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी प्रा. अरुण शिकलगार, विशाल पाटील, लिपिक राजेश रुकडे, मदतनीस सुशांत पाटील, विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.