| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १५ जुलै २०२५
शारदानगर परिसरातील ४५०० चौरस फूट आकाराच्या महापालिकेच्या ओपन स्पेससाठी सध्या कायदेशीर संघर्ष रंगात आला आहे. तब्बल तीन दशकांपासून काही मुस्लिम कुटुंबांकडून या भूखंडावर मशीद उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, स्थानिक सतर्क नागरिकांनी वेळोवेळी या कारवायांना अटकाव घातला.
सदर जागा मूळ मालकांनी गुंठेवारी करताना सार्वजनिक उपयोगासाठी राखीव ठेवली होती. मात्र, मे महिन्यातील न्यायालयीन सुट्टीच्या काळात काही मुस्लिम नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने एकतर्फी न्यायालयीन निकाल मिळवला. या पार्श्वभूमीवर स्थानिक हिंदू नागरिकांनी केलेल्या सखोल अभ्यासातून त्यांच्याकडे असलेली तहसील व प्रथमिक न्यायालयातील कागदपत्रे, तसेच महापालिकेच्या नोंदींनुसार भूखंड हा सार्वजनिक जागा म्हणून मान्य असल्याचे पुरावे सादर करण्यात आले.
या संपूर्ण घडामोडीच्या विरोधात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले. शिष्टमंडळात किशोर पाटील (श्री शिवातिवान हिंदुस्थान), माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, विष्णू माने, बाळासाहेब प्राधिकर, सचिन साळुंके, अंकुश ठोंबरे, प्रवीण शिंदे, आदित्य पाटील, सुनीत चटौत, योगेश चंगुळे, आकाश जाधव आदींचा समावेश होता.
यावेळी आयुक्त गांधी यांनी खात्री दिली की, खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल असूनही महापालिका या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. महानगरपालिकेच्या बाजूने सक्षम वकील नेमून हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात परत मिळवला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
याशिवाय, शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदार व सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांचीही भेट घेऊन सर्व संबंधित कागदपत्रांची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली आणि अधिकृत निवेदनही दिले.