| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १५ जुलै २०२५
संशोधन हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसते; ते प्रेरणेने पेटलेल्या मनांतही घडत असते. सांगलीतील राममंदिर चौकात चहाचा स्टॉल चालवणाऱ्या नवनाथ पसारे यांचा मुलगा प्रेम, अवघ्या दहावीत शिकणारा, आज अपघात रोखणाऱ्या तंत्रज्ञानाचे जनक ठरतो आहे.
प्रेम पसारे याने 'ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टिम' नावाची अभिनव सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा वाहन चालकाने नशेत वाहन चालवण्याचा प्रयत्न केला, तर लगेचच संबंधित गाडीचा मालक, पोलिस किंवा आरटीओ यांच्यापर्यंत त्या वाहनाचे लोकेशन, नंबर, चेसिस तपशीलांसह एक व्हॉईस कॉल पाठवते. एवढ्यावरच न थांबता, गाडीचे इंजिनही आपोआप बंद होते – यामुळे संभाव्य अपघात टाळता येतो.
या संकल्पनेचा उदय एका धक्कादायक दृश्यातून झाला. काही काळापूर्वी प्रेम आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना नशेत वाहन चालवणाऱ्या एका चालकाने घडवलेल्या अपघाताचे साक्षीदार झाला. त्या प्रसंगाने त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला – "हे टाळता येणार नाही का?" आणि हाच प्रश्न पुढे त्याच्या संशोधनाचा पाया ठरला.मागील दीड वर्षांच्या अथक प्रयत्नातून, तो सतत वेगवेगळ्या कल्पनांवर काम करत होता. याआधीही त्याने स्वतः रिमोट कंट्रोल तयार करून फटाके सुरक्षितरीत्या फोडण्याचा प्रयोग केला होता. मात्र ही ‘ड्रंक अॅलर्ट’ प्रणाली ठोस सामाजिक गरज ओळखून विकसित करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रेमच्या वडिलांनी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन दिले. पंधरा हजार रुपयांच्या खर्चात बसवता येणाऱ्या या यंत्रणेसाठी सध्या कॉपीराईट आणि पेटंट मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, लवकरच ते अधिकृतपणे त्याच्या नावावर नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
आज या शालेय संशोधकाच्या कल्पकतेचे कौतुक सांगलीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र होत आहे. शाळकरी वयात समाजहिताची जाण ठेवत विकसित केलेल्या या यंत्रणेचा वापर शालेय वाहतूक, खासगी वाहनं आणि प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर केल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.
प्रेमसारख्या तरुणांच्या हातात समाजाचे उद्याचे भविष्य आहे, हे या उदाहरणावरून पुन्हा सिद्ध होते.