| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. ११ जुलै २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सांगली शहरातल्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय आजच्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. सांगली संस्थानाच्या सी.एस. नं. १ मधील एकूण ६४ मिळकतींचे सत्ताप्रकार 'एल' वरून 'ए' मध्ये विनामूल्य रूपांतर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सन १९२८ मध्ये तयार झालेल्या या मिळकती शासन अभिलेखांमध्ये 'एल' सत्ताप्रकार, म्हणजेच शासकीय जागा किंवा इमारती म्हणून नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामुळे संबंधित नागरिकांना त्यांच्या जमिनींच्या खरेदी-विक्री, वापरातील बदल यांसारख्या व्यवहारांवर कायदेशीर मर्यादा भोगाव्या लागत होत्या.
मात्र, या मिळकती नागरिकांनी रितसर खरेदीखतांद्वारे विकत घेतलेल्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सत्ताप्रकारातून मुक्त करणे आवश्यक ठरले. परिणामी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २०(१) आणि २९ नुसार या जमिनींचे विनामूल्य 'एल' वरून 'ए' सत्ताप्रकारात रूपांतर करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत मंजूर झाला.
ठळक बाबी :
६४ जमिनींचा सत्ताप्रकार विनामूल्य बदलणार
१९२८ पासून 'एल' सत्ताप्रकारामुळे व्यवहारांवर निर्बंध
रितसर खरेदी केलेल्या जमिनींना मिळणार कायदेशीर मान्यता
नागरिकांना दिलासा; व्यवहारांना गती
या निर्णयामुळे सांगली शहरातील अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनीवरील कायदेशीर स्वातंत्र्य प्राप्त होणार असून, येथील स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांना नवी दिशा व गती मिळणार आहे. नागरी विकासाच्या दृष्टीनेही ही बाब अत्यंत सकारात्मक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.