yuva MAharashtra "पोलिस काका आणि पोलिस दीदी" उपक्रम, जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार - संदीप घुगे

"पोलिस काका आणि पोलिस दीदी" उपक्रम, जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार - संदीप घुगे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. ११ जुलै २०२५

जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरण व छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिस प्रशासनाने एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. "पोलिस काका आणि पोलिस दीदी" या संकल्पनेद्वारे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून त्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

घुगे म्हणाले की, अलीकडील काळात काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत — आटपाडीत टोळक्याच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आयुष्य संपवलं, तर तासगावमध्ये एका मुलीचा पाठलाग करण्यात आला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधिकारी शाळा-महाविद्यालयांना नियमित भेटी देतील आणि विद्यार्थिनींमध्ये विश्वास निर्माण करतील.

त्याचबरोबर, जिल्ह्यात खूनाच्या घटनाही चिंताजनक पातळीवर पोहोचल्या असून मागील सहा महिन्यांत तब्बल ३८ खून घडले आहेत, त्यापैकी बहुतेक खाजगी व कौटुंबिक वादातून झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा गुन्ह्यांपूर्वीच हस्तक्षेप करण्यासाठी पोलिस पाटलांना अधिक सक्रिय करण्यात येणार आहे. घरगुती वाद, जमिनीचे प्रश्न यासारख्या वादांमुळे गंभीर गुन्हे होण्यापूर्वीच त्यांचे निरसन व्हावे यासाठी तंटामुक्त समित्याही सक्रीय केल्या जातील.

दरम्यान, मिरजेतील मिरवणुकीदरम्यान परवानगीशिवाय वापरण्यात आलेले परदेशी झेंडे आणि नेत्यांचे फोटो या प्रकारावरही अधीक्षक घुगे यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या विनापरवानगी मिरवणुकांवर आता कठोर निर्बंध येणार असून, अशा प्रकरणांमध्ये परवाने नाकारण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन्स आणि नाकाबंदी वाढवली जात आहे. चोरी व घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी सज्ज असून, संशयितांना त्वरित अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून, शस्त्रसज्ज फोटो किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्सवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.

आटपाडी येथील आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाने पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले असून, संबंधित गुन्ह्यांमध्ये गतीने तपास करून लवकरात लवकर न्यायप्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. करगणी प्रकरणातही आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधीक्षक घुगे यांनी यावेळी सांगितले.