| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. ११ जुलै २०२५
सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
आज सांगलीत झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांतून आलेल्या नेत्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये सांगलीतील पाच माजी नगरसेवकांसह पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी व इतर जिल्ह्यांतील कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.
या सोहळ्याला आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, चंद्रहार पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे नेतृत्व आहे. ग्रामीण भागातून उगम पावलेले असल्यामुळेच त्यांना सामान्य कार्यकर्त्यांचे दुःख समजते आणि ते न्याय देतात.
या कार्यक्रमात काँग्रेसचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रदेश सचिव सागर वनखंडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव राज सोनार, माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे, सुरेश शेळके, अश्विनी कांबळे, कल्लाप्पा कांबळे, माजी सभापती अनिता वनखंडे, माजी शिक्षण उपसभापती तानाजी व्हनकडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, रत्नागिरीतील महिला नेत्री वर्षा पितळे, कोल्हापूरच्या प्राची पोतदार, दक्षिण कराडच्या रोहीणी लोंढे, मुक्ताईनगरमधील विष्णू राणे व भुसावळचे आदित्य राणे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अयोध्येत कारसेवेत सहभागी झालेले सुरेश शेळके यांनी देखील आज पुन्हा मूळ शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींमुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आजही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पुढे जात असल्याची स्पष्ट छाप लोकांमध्ये उमटल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.