| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. ९ जुलै २०२५
मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या वादात आता मराठी-परप्रांतीय चर्चेने रंग घेतला असून, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक आक्षेपार्ह विधान करत वाद पेटवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली असून, काही माध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
दुबे यांचे वक्तव्य काय होते?
एका मुलाखतीत बोलताना दुबे म्हणाले, “मराठी बोलणं अनिवार्य असावं असं म्हणणाऱ्यांनी आधी विचार करावा की, त्यांना पोट भरण्यासाठी पैसा कुठून मिळतो. महाराष्ट्रात मोठ्या उद्योगांची निर्मिती झाली नसून, टाटा-बिर्ला यांसारख्या कंपन्यांनी महाराष्ट्राबाहेर पहिले प्रकल्प उभारले. तुम्ही दिलेल्या करामुळे नव्हे, तर आमच्या योगदानामुळे हा प्रदेश चालतो," असा दावा त्यांनी केला.
दुबे यांची सोशल मीडियावरील टिपणी
दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना उद्देशून लिहिलं की, “मुंबईत हिंदी भाषिकांना धमकावणाऱ्यांनो, जर दम असेल तर उर्दू भाषिकांवरही कारवाई करून दाखवा. आपल्या घरात प्रत्येकजण वाघ असतो, पण बाहेर कुणी काय आहे, हे समजतं.” हे विधान प्रचंड वादग्रस्त ठरलं असून, समाजमाध्यमांवरूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
फडणवीस यांचं स्पष्टीकरण
या वादावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबे यांचे समर्थन करताना स्पष्ट केलं की, “दुबे यांनी जे विधान केलं ते मराठी समाजाविषयी नव्हतं, तर विशिष्ट संघटनेस उद्देशून होतं. तरीही, अशा प्रकारचं वक्तव्य योग्य वाटत नाही, कारण त्यामुळे गैरसमज आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो,” असं ते म्हणाले. त्यांनी मराठी माणसाच्या योगदानाबद्दल गौरवोद्गारही काढले.
राजकीय तापमान वाढले
या घडामोडींनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून, परप्रांतीयांविषयीच्या भावना आणि भाषावाद पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एकीकडे मनसे आपली भूमिका ठामपणे मांडत आहे, तर दुसरीकडे भाजपने या विषयावरून समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.