yuva MAharashtra कोचिंग क्लासेसचा विचार करुन नवीन कायदा येणार; विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती राहावी यावरही भर

कोचिंग क्लासेसचा विचार करुन नवीन कायदा येणार; विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती राहावी यावरही भर

| सांगली समाचार वृत्त |
मिरज - गुरुवार दि. १० जुलै २०२५

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि कोचिंग क्लास चालकांच्या हिताची जपणूक करत नवीन नियंत्रण कायदा तयार केला जाणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या मसुद्यात आवश्यक ते बदल करून तो अधिक परिणामकारक आणि न्याय्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या चर्चासत्रात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आपली मते स्पष्टपणे मांडली. यामध्ये संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रशांत कासार (कोल्हापूर), समन्वयक दिलीप महिंदळे (मुंबई), माजी अध्यक्ष रवींद्र फडके (मिरज) हे सहभागी होते.

शिष्टमंडळाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव देओल यांची भेट घेऊन विविध अडचणी आणि सुधारणा सुचविल्या. त्यांनीही आपल्या दैनंदिन व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून शिष्टमंडळाचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. या चर्चेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे सचिव उन्मेष मोहिते यांचेही मोलाचे योगदान लाभले.

शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत आणि अधिकारी योगिता देशमुख यांनी देखील कोचिंग क्लासेस नियंत्रणाच्या मसुद्यातील त्रुटींवर सकारात्मक चर्चा केली. योग्य त्या सुधारणा करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, विधिमंडळात यावर सविस्तर चर्चा होईल आणि पुन्हा एकदा शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले जाईल, असेही सांगण्यात आले.

या प्रक्रियेसाठी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार प्रशांत कुलकर्णी (सातारा), रवी शितोळे (धाराशिव), आणि विनायक परिचारक (पंढरपूर) यांनी शिष्टमंडळाला योग्य मार्गदर्शन केले.

दरम्यान, संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल एप्रिल २०२४ मध्ये लागला होता. त्यानुसार, कोचिंग क्लासेस नियंत्रणाच्या धोरणात याचिकाकर्त्यांची भूमिका समाविष्ट करण्याचा निर्देश शालेय शिक्षण विभागाला देण्यात आला होता. याच निर्णयाच्या प्रतिमा शिष्टमंडळाने आपल्या निवेदनासोबत सादर केल्या.

माजी अध्यक्ष रवींद्र फडके यांनी पत्रकारांना दिलेल्या पत्रकात या सर्व घडामोडींचा उल्लेख केला असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी सौजन्य : चंद्रकांत राजाराम क्षीरसागर