| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ९ जुलै २०२५
मिरज – कुपवाड रस्त्यावर नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीवर मिरज पोलिसांनी कारवाई केली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. मिरज ते कुपवाड एमआयडीसी मार्गावर काही जण नशेच्या गोळ्यांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचत चार जणांना पकडले. त्यांच्याकडून ‘छळीप १०’ नावाच्या ९२८ नशेच्या गोळ्या, गांजाने भरलेल्या तीन चिलम, व एक मोपेड जप्त करण्यात आली.
अटक केलेल्यांमध्ये इब्राहीम उर्फ आरबाज रेठरेकर (२१, अमननगर), अब्दुलरझाक शेख (२०, मालगाव रोड, आलीशान कॉलनी), आणि उमरफराज शेख (३२, बागवान गल्ली, शनिवार पेठ) यांचा समावेश आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपीला बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.
‘नशामुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिलेल्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील, रुपाली गायकवाड, तसेच कर्मचारी विनोद शिंदे, सचिन कुंभार, अभिजीत घनगर, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, नानासाहेब चंदनशिवे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, चसयराज कुंदगोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.