| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - सोमवार दि. ७ जुलै २०२५
आषाढी एकादशीनिमित्त विठोबाच्या नगरीत भक्तीचा महासागर उसळला असून, देशाच्या विविध भागांतून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी पंढरपूरात हजेरी लावली आहे. सध्या अंदाजे १५ ते २० लाख भाविक मंदिर परिसरात दाखल झाल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पारंपरिक शासकीय पूजा पार पडली. यानंतर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून, ही रांग तब्बल पाच किलोमीटरपर्यंत पसरली आहे. मागील काही दिवसांपासूनच पंढरपूरात भाविकांची ये-जा सुरू असून, प्रत्येक टप्प्यावर आस्थेने दर्शन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडून मंदिर परिसरातील १४ प्रमुख मार्गांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रतीमिनिट ३० ते ३५ भाविकांना दर्शन मिळत आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.
शासन, प्रशासन आणि अनेक सामाजिक संस्थांच्या समन्वयातून केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय झालेली नाही. दर्शन रांगेच्या व्यवस्थापनात काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे विठूमाऊलीचे दर्शन शिस्तबद्ध आणि शांततेत सुरू आहे. अशा सुयोग्य नियोजनामुळे भाविकांत समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे.