yuva MAharashtra राज ठाकरे की "थप्पड की गुंज" बंबई से बिहार तक...

राज ठाकरे की "थप्पड की गुंज" बंबई से बिहार तक...

          फोटो सौजन्य  : फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. ७ जुलै २०२५

१९८६ साली प्रदर्शित झालेल्या मल्टीस्टारर कर्मा चित्रपटाने त्यावेळेस प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती... पण त्यातील डॉ. डॅन्ग अर्थात अनुपम खेरचा दिलीपकुमारला उद्देशून उच्चारलेला... "इस थप्पड की गुंज तुम जिंदगीभर नही भुलोगे जेलर" हा डायलॉग खूपच गाजला होता... या चित्रपटातील, हा डायलॉग राज ठाकरे यांना सध्या तंतोतंत लागू होतोय...

५ जुलै रोजी १९ वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधूंचे ऐतिहासिक मनोमिलन आणि वडाळ्याच्या एनएससीआय डोमवरील स्टेजवरून केलेली भाषणे अनेकांना झोंबली... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह भाजप आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी आपआपली मते व्यक्त केलीच... पण 'राज ठाकरे की "थप्पड की गुंज" बंबई से बिहार तक पहुंच गई' असं म्हटलं तर वावगं ठरू नये...

राज ठाकरे यांची परप्रांतीयाबद्दलची भूमिका सर्वश्रुत आहे... किंबहुना त्यांचे राजकारणच 'परप्रांतीय आणि भूमिपूत्र' या मुद्यांवर फिरत असते... आणि या विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांनी हा मुद्दा अधोरेखित केला होता. त्याचे पडसादही या दोन दिवसात उमटू लागले आहेत. विशेषत: उत्तर भारतीय नेत्यांचा पुन्हा एकदा जळफळाट झाला आहे...

पूर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव यांनी आता या हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. 'राज ठाकरे यांचे लोक महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करतायत. मी राज ठाकरेंना आव्हान देतोय, त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेन!' असे पप्पू यादवांनी म्हटलंय.

यापूर्वीच मुंबईस्थित उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून आपली टकळी चालवली होती. आता पप्पू यादव यांनी आपली भडास व्यक्त केली आहे. यावरूनच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा धसका सर्वच राजकीय नेत्यांनी घेतला आहे. अर्थात ५ जुलैच्या इव्हेंट चा कोणाला किती फायदा होतो नि कोणाला तोटा हे येणारा काळच ठरवेल. आणि याची झलक आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पहावयास मिळेल. या निवडणुकीतील यशापयशावरच ठाकरे बंधूंच्या आगामी वाटचालीचे आणि राजकारणाचे भवितव्य ठरेल.