फोटो सौजन्य : Wikimediacommons
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - रविवार दि. ६ जुलै २०२५
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता अधिक स्वस्त होणार आहे. पुल, बोगदे, उड्डाणपूल किंवा उंचावरील रस्त्यांवरून प्रवास करताना आता प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत केवळ निम्मा टोल भरावा लागणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला असून, टोल आकारणीच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आहेत.
आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना प्रत्येक किलोमीटरसाठी ठराविक दराने टोल वसूल केला जात होता. मात्र, ज्या मार्गांमध्ये खास रचना – म्हणजेच उड्डाणपूल, बोगदे, पूल – अधिक प्रमाणात आहेत, तिथे यापुढे नवा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. २ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, रचना असलेल्या भागांसाठी टोल मोजताना आता महामार्गाच्या एकूण लांबीच्या पाचपट किंवा त्या रचनांच्या लांबीच्या दहापटांपैकी जे कमी असेल, त्या आधारावर गणना केली जाईल.उदाहरणार्थ, एखाद्या महामार्गाची एकूण लांबी ४० किलोमीटर असून त्यात प्रामुख्याने रचना असतील, तर त्या लांबीच्या दहापट म्हणजे ४०० किमी किंवा एकूण लांबीच्या पाचपट म्हणजे २०० किमी यापैकी जो कमी आकडा असेल, त्याच्या आधारावर टोल आकारला जाईल. यामुळे प्रत्यक्षात वापरकर्त्यांवर टोलचा भार ५० टक्क्यांनी कमी होईल.
या निर्णयामागे मोठ्या प्रकल्पांवर होणारा खर्च आणि पूर्वीची टोल गणना यांचा फेरविचार कारणीभूत ठरला आहे. आधीच्या नियमानुसार, अशा रचनांमुळे प्रवाशांकडून टोलचे दहापट शुल्क आकारले जात होते. मात्र आता सुधारित प्रणालीमुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सामान्य नागरिकांना थेट दिलासा मिळेल.