| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - रविवार दि. ६ जुलै २०२५
कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात एक नवीन पर्व सुरू करणारी अभिमानास्पद बातमी! प्रा. डॉ. किरण रावसाहेब पाटील यांची जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात रासायनिक अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून थेट नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नावावर संशोधनाचा ठसा असलेल्या किरण पाटील यांना विद्यापीठाकडून विशेष आमंत्रणाद्वारे सन्मानपूर्वक बोलावण्यात आले.
पाटील यांचे कुटुंब मूळचे निपाणीजवळील पट्टणकुडी गावचे. त्यांचे वडील श्री. रावसाहेब पाटील हे अन्न व औषध प्रशासन विभागातून निवृत्त झालेले अधिकारी असून, ते कोल्हापुरात स्थायिक आहेत. प्रा. डॉ. किरण पाटील हे सांगलीतील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ विजयकुमार सकळे, सांगली मेडिकल हबचे संचालक अजितकुमार सकळे व जेष्ठ भांडी व्यापारी संजयकुमार सकळे यांचे भाचे आहेत. पाटील कुटुंब एक सुसंस्कृत, सुसंवादी मूल्यांची शिकवण देणारे कुटुंब मानले जाते.
डॉ. पाटील यांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी. सातारा पॉलिटेक्निकमधून त्यांनी डिप्लोमा मिळवल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून बी.टेक, त्यानंतर आयआयटी मुंबईतून एम.टेक पूर्ण केला. उच्च शिक्षणासाठी त्यांनी डेन्मार्कमधील नामांकित विद्यापीठात पीएचडी केली आणि त्यानंतर युरोपातील विविध प्रयोगशाळांमध्ये जीवशास्त्र व अभियांत्रिकीच्या सीमारेषांवर संशोधन करत ठसा उमटवला.
विशेष म्हणजे, त्यांनी डीटीयूमध्ये प्राध्यापक म्हणून ट्रान्सक्रिप्शनल रेग्युलेशन व मेटाबॉलिक इंजिनिअरिंग क्षेत्रात संशोधनाचे नेतृत्व केले. त्यानंतर, जर्मनीतील ईएमबीएल येथे कॉम्प्युटेशनल बायोलॉजी युनिटमध्ये त्यांनी कार्य केले. २०१९ मध्ये त्यांची MRC Toxicology युनिटमध्ये रिसर्च डायरेक्टर म्हणून निवड झाली. २०२२ मध्ये त्यांनी मॉलिक्युलर सिस्टम्स बायोलॉजीचे प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली.त्यांचा केंब्रिज विद्यापीठातील प्रवेश म्हणजे केवळ एक शैक्षणिक नियुक्ती नाही, तर जैन समाजाच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श मार्गदर्शन ठरू शकतो. दक्षिण भारत जैन सभेच्या स्वप्नांना त्यांनी मूर्त स्वरूप दिले आहे. त्यांच्या या यशामागे केवळ कष्टांची पराकाष्ठा नाही, तर समर्पणाची अखंड भावना आहे.
केंब्रिज विद्यापीठात भारतीय वंशाच्या काही मान्यवर प्राध्यापकांनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. प्रा. शंकर बालसुब्रमण्यम, प्रा. श्रुती कपिला यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत आता डॉ. किरण पाटील यांचाही समावेश झाला आहे.
पाटील आणि सकळे घराण्याची ही शौर्यगाथा समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. जैन समाजाला जागतिक मानचित्रावर सन्मानाने उभे करणाऱ्या या तेजस्वी सुपुत्रास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
बातमी स्रोत : प्रा. एन. डी. बिरनाळे