| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - रविवार दि. ६ जुलै २०२५
५ जुलैच्या दिवशी मुंबईत राजकीय रंगमंचावर एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. अनेक वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांचे बाण सोडले.
या राजकीय एकत्र येण्याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे टिप्पणी केली की, ‘‘बाळासाहेब ठाकरेंना जे शक्य झालं नाही, ते फडणवीसांनी साध्य केलं.’’ त्यांच्या या विधानावर फडणवीसांनीही प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीसांचा टोला : "रुदाली मेळावा!"फडणवीस म्हणाले, “मी राज ठाकरेंचे आभार मानतो. त्यांनी दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणल्याचं श्रेय मलाच दिलं. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाददेखील मला मिळतील.” त्याचबरोबर त्यांनी टोमणा मारला की, “या कार्यक्रमाचं नाव ‘विजयी मेळावा’ असलं, तरी तिथं भाषणं ऐकताना मला ‘रुदाली’ वाटली.”मराठी विषय गाजवण्याच्या ऐवजी, “आमचं सरकार पडलं, आम्हाला पुन्हा संधी द्या,” अशा मागण्याच कानावर आल्या, असा टोलाही त्यांनी लगावला.
“मुंबईचा चेहरा बदलला, मराठी माणूस आता बेघर नाही”
मुंबई महापालिकेवरील ठाकरे गटाच्या दीर्घकाळच्या सत्तेवर टीका करत फडणवीस म्हणाले, “२५ वर्ष महापालिकेवर सत्ता असूनही काहीच ठोस काम झालं नाही. उलट मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. पण आता आम्ही बीडीडी चाळ, पत्राचाळ यांसारख्या ठिकाणी मराठी माणसाला त्यांच्या हक्काचं आणि सन्मानाचं घर देतो आहोत. यामुळेच काहींच्या मनात असूया निर्माण झाली आहे.”
निवडणुकीचा रोख ‘हिंदुत्व’कडे?फडणवीसांनी पुढे स्पष्ट केलं की, “मुंबईत मराठी आणि अमराठी दोघंही आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगतो. तसंच आम्ही हिंदू आहोत आणि आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे.” महापालिकेच्या निवडणुकीत ‘हिंदुत्व’ हाही मुद्दा ठरणार असल्याचं संकेत त्यांनी दिले.