| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ६ जुलै २०२५
सांगली महापालिकेतील वीज बिल घोटाळा आता थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजू लागला आहे. या गंभीर प्रकरणावर आमदार सदाभाऊ खोत यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत संथ चौकशीवर जोरदार ठपका ठेवला असून, यासंबंधी सविस्तर चर्चा पुढील आठवड्यात सभागृहात होणार आहे.
महापालिकेच्या पथदिव्यांसाठी महावितरणकडे पाठवले जाणारे धनादेश काही निवडक वीज बिलांच्याच भरपाईसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. उर्वरित निधीचा वापर खासगी व्यक्ती, कंपन्या आणि संस्थांच्या वीज बिलांसाठी करण्यात आला. एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत तब्बल 1.28 कोटींचा आर्थिक अपहार झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून, याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे चार्टर्ड अकाउंटंटमार्फत पाच वर्षांचे सखोल लेखापरीक्षण करण्यात आले. त्यातून 3.45 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला. लोकायुक्तांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पोलिस महासंचालकांना विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आदेश दिले होते. दोन वर्षांपूर्वी एसआयटीची नियुक्ती झाली, तरी अद्याप संपूर्ण चौकशी पूर्ण झालेली नाही.
महापालिकेने नगरविकास विभागास दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित अभियंत्यांकडून पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे आणि चौकशी सुरू असून, त्यामध्ये विविध कार्यालयांतील माहिती संकलन, फॉरेन्सिक ऑडिट व इतर तपशीलवार प्रक्रियांमुळे वेळ लागतो आहे. एसआयटीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई शक्य होईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार खोत यांनी या प्रकरणावर सभागृहात चर्चा व्हावी यासाठी पुढील आठवड्यात लक्ष वेधले आहे. त्यांना मिळालेल्या प्राथमिक उत्तरावर समाधान नकारात्मक असून, संथ तपास प्रक्रियेवर ते विधिमंडळात आवाज उठवणार असल्याची माहिती दिली आहे.