yuva MAharashtra कोथळे खून प्रकरण : युवराज कामटेच्या उलट तपासात खोटेपणाचा पत्ता, सरकारी पक्षातर्फे उघड

कोथळे खून प्रकरण : युवराज कामटेच्या उलट तपासात खोटेपणाचा पत्ता, सरकारी पक्षातर्फे उघड

                  फोटो सौजन्य : दै. पुढारी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ६ जुलै २०२५

सांगलीतील बहुचर्चित कोथळे खून प्रकरणात शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पडवळ यांच्या न्यायालयात सुनावणीस पुन्हा एकदा गती मिळाली. या दिवशी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी संशयित युवराज कामटे याच्यावर बचाव पक्षाच्या साक्षीदाराच्या भूमिकेतून उलट तपासणी सुरू ठेवली. तपासणीदरम्यान कामटे याने अनेक प्रश्नांना “आठवत नाही” अशी उत्तरे देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील विसंगती ओळखून सरकार पक्षाने त्याच्याकडून खोटेपणा स्पष्टपणे समोर आणला.

सुमारे दोन तास चाललेल्या या उलट तपासात, निकम यांनी युवराज कामटे याला पोलिस ठाण्यांमधील अंतराविषयी विचारले असता, “मला माहीत नाही” अशी प्रतिक्रिया देण्यात आली. विशेष म्हणजे, यापूर्वी त्याने स्वतःहून काही ठिकाणांचे अंदाजे अंतर न्यायालयात सांगितले होते.

तसेच, गेल्या दहा वर्षांपासून वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाची विचारणा केली असता, तोदेखील आठवत नसल्याचा बनाव कामटे याने केला. सरकारी वकील कुंडलिक चवरे यांना गुन्ह्यानंतर केलेले फोन किंवा त्यांच्यासमोर दिलेली गुन्ह्याची कबुली याबाबतही कामटेने सरळ नकार दिला आणि चवरे यांनाच ओळखत नसल्याचे सांगितले.

मिरज येथे पार पडलेल्या 'सद्भावना कार्यशाळा'त तो प्रत्यक्ष उपस्थित होता, असा दावा कामटेने केला असला तरी त्याच्या उपस्थितीचा कोणताही ठोस दस्तऐवज सादर करता आला नाही. सीसीटीव्ही तंत्रज्ञ सुधीर पिसाळ यांच्याशी डीव्हीआर संदर्भात संबंध असल्याचा मुद्दाही त्याने फेटाळून लावत पिसाळ यांना ओळखत नसल्याचे सांगितले.

एकूणच, कामटे याने खोटे बोलल्याचे ठोस संकेत सरकारी पक्षाने न्यायालयाच्या नजरेस आणले असून, त्यांच्या बाजूची मांडणी प्रभावी ठरली. विशेष सरकारी वकील निकम यांना या वेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांची सहाय्यक भूमिका लाभली.

तांत्रिक कारणांमुळे न्यायालयीन प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली असून, पुढील सुनावणी व उलट तपासणी १९ जुलै रोजी होणार आहे. या वेळी पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.