yuva MAharashtra पंढरीत आषाढी एकादशीचा भक्तिरस; लाखो भाविकांचा महासागर, वाखरीत पालख्यांचा शेवटचा मुक्काम

पंढरीत आषाढी एकादशीचा भक्तिरस; लाखो भाविकांचा महासागर, वाखरीत पालख्यांचा शेवटचा मुक्काम

| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - शनिवार दि. ५ जुलै २०२५

पंढरपूर नगरीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भक्तिरसाचं मोठं उधाण आलं असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सात ते आठ लाख वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहेत. सावळ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी उभी असलेली रांग आंतापूरच्या पुढे पाच किलोमीटरपर्यंत पसरलेली असून, यामध्येच सुमारे एक लाखांहून अधिक भक्त सहभागी झाले आहेत.

आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत वाखरी या पारंपरिक मुक्कामस्थळी पोहोचल्या आहेत. राज्यभरातून आलेल्या विविध दिंड्याही दिवसभर पंढरीत प्रवेश करत असून, शहरात भक्तांच्या लाटाच लाटा उसळत आहेत.

दर्शनासाठी उभी असलेली भाविकांची रांग अनेक तास चालत असून, पदस्पर्श दर्शनासाठी किमान सात ते आठ तासांचा कालावधी लागतो आहे. विठोबाच्या भेटीसाठी आलेल्या भक्तांची ही न थकणारी श्रद्धा पाहून पंढरीतील वातावरण भक्तीमय झाले आहे.

यंदा मंदिर समितीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जुन्या पत्राशेडऐवजी भव्य आणि जलरोधक मंडप उभारला आहे. या मंडपात पाणी, लाईट, थंडावा देणाऱ्या कुलरची सोय करून वारकऱ्यांसाठी निवासाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने यंदा अधिकचा निधी उपलब्ध झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, सुलभ शौचालये, मार्गदर्शक सूचना फलक यांसह ‘भक्तीसागर’, एसटी स्टँड आणि चंद्रभागा घाट परिसरात सोयीसुविधांचा विस्तार केला आहे.

शनिवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार असून, त्यांच्यासोबत असंख्य इतर संतांच्या पालख्या आणि हजारो दिंड्याही पोहोचतील. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या व्यवस्थांची खरी कसोटी उद्या लागणार आहे.