| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. १७ जुलै २०२५
सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीस येणाऱ्या प्लास्टिक फुलांमुळे नैसर्गिक फुलशेतीवर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मागणी करत, राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची गरज अधोरेखित केली आहे. यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनाला १०५ आमदारांचा ठोस पाठिंबा मिळाल्यामुळे या मागणीला अधिक बळ मिळाले आहे.
आमदार पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सध्या राज्यात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिक फुलांचा वापर झपाट्याने वाढला आहे. परिणामी नैसर्गिक फुलांची मागणी घटल्याने, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यांनी सूचित केले की, जसे प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली, तसेच कृत्रिम फुलांवरही निर्बंध आणल्यास फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होऊ शकते.
या विषयाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगावले यांनी देखील प्लास्टिक फुलांवरील बंदीस अनुकूलता दर्शवली आहे.
फुलशेती ही द्राक्ष व अन्य फळपिकांच्या पर्यायी स्वरूपात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. मात्र यासाठी लागणारा खर्च – औषधे, मजुरी, वाहतूक – आणि विक्रीतील घट यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या विषयावर तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे रोहित पाटील यांनी स्पष्ट केले.
या मागणीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे राज्य शासनाच्या निर्णयप्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ शेतकऱ्यांचे नुकसानच नव्हे, तर पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम लक्षात घेता कृत्रिम फुलांवर बंदी अत्यावश्यक असल्याचा सूर या चर्चेत उमटत आहे.