yuva MAharashtra परीक्षेच्या प्रवासात मृत्यूचे आमंत्रण; मित्रासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी अंत

परीक्षेच्या प्रवासात मृत्यूचे आमंत्रण; मित्रासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी अंत

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १७ जुलै २०२५

सांगली-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील फल्ले मंगल कार्यालयाजवळ बुधवारी सकाळी दुचाकी आणि शिवशाही बस यांच्यात झालेल्या अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

साहिल अंसारी मुलाणी (वय २२, रा. नागठाणे, ता. पलूस) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या मित्राला परीक्षेसाठी सांगलीला घेऊन चालला होता. त्याचा मित्र प्रतिक साळुंखे (वय १९, रा. इस्लामपूर) याच्या स्टेनोग्राफीच्या परीक्षेसाठी दोघे दुचाकीवरून निघाले होते. प्रतिककडे लायसन्स नसल्यामुळे साहिलने त्याची दुचाकी चालवली.

सकाळी सव्वा आठच्या सुमारास सांगलीवाडी टोलनाक्यानजीक शिवशाही बससोबत झालेल्या जोरदार धडकेत साहिलच्या डोक्याला गंभीर इजा झाली. जागीच त्याचा प्राण गेलेला होता. प्रतिक हा मागे बसलेला असल्याने तो थोडक्यात बचावला पण गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातग्रस्त दुचाकी (एमएच १० ईडी ४६९९) आणि शिवशाही बस (एमएच ०९ ईएम १४७९) यांची नोंद घेतली असून, बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल हा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी. कॉमच्या शिक्षणात होता. तो अत्यंत उत्साही व मदतीस तत्पर असा युवक होता. मित्राच्या परीक्षेसाठी स्वतःची जबाबदारी घेत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. या दुर्दैवी घटनेने नागठाणे, इस्लामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.