| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. १७ जुलै २०२५
सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारी भूखंड, प्लॉट तसेच झोपडपट्ट्यांमधील वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांना कायदेशीर मान्यता मिळावी आणि ही घरे संबंधित धारकांच्या नावावर करून देण्यात यावीत, अशी ठाम मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी या मुद्यावर श्री. फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करत निवेदन सादर केले.
गाडगीळ यांच्या म्हणण्यानुसार, या महानगर क्षेत्रात हजारो कुटुंबे वर्षानुवर्षे राहत असून त्यांच्या मालमत्तांचे अधिकृत हक्क अद्याप प्रस्थापित झालेले नाहीत. परिणामी, केंद्र व राज्य सरकारच्या आवास व पुनर्वसन योजनांचा लाभ मिळवताना त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल, कामगार कल्याण योजना यांसारख्या अनेक उपक्रमांपासून हे रहिवासी वंचित राहतात.
स्थानिक झोपडपट्टी पुनर्वसन समित्यांचाही या प्रश्नावर जोरदार पाठपुरावा सुरू आहे. या घरांना वैधता मिळाल्यास, संबंधित नागरिकांना शासनाच्या लाभ योजनांचा सहजपणे लाभ घेता येईल. त्यामुळे सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित प्लॉट्स व घरे अधिकृतरित्या त्यांच्या नावे करावीत, अशी मागणी गाडगीळ यांनी केली आहे.