yuva MAharashtra महापालिकेने वाटले २४ भूखंडांचे श्रीखंड; माजी नगरसेविका आरती वळवडे यांची कारवाईची मागणी

महापालिकेने वाटले २४ भूखंडांचे श्रीखंड; माजी नगरसेविका आरती वळवडे यांची कारवाईची मागणी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १७ जुलै २०२५

2019 ते 2022 या कालावधीत महापालिकेने विविध संस्था, ट्रस्ट आणि खासगी व्यक्तींना एकूण २४ भूखंड विकासासाठी वापरण्यास दिले. विशेष बाब म्हणजे, यापैकी कोणतीही रक्कम महापालिकेने त्यांच्या कडून घेतलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि भूखंड पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घ्यावेत, अन्यथा बाजारभावानुसार भाडेकरार करूनच उपयोगासाठी द्यावेत, अशी ठाम मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आरती वळवडे यांनी केली आहे.

वळवडे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महापालिकेच्या हद्दीतील २४ भूखंड विविध संस्थांना चुकीच्या पद्धतीने विनामोबदला दिले गेले आहेत. महापालिका अधिनियमाच्या कलम ७९ (ड) नुसार कोणतीही स्थावर मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा हस्तांतरण करताना सद्य परिस्थितीतील बाजारभावानुसार मोबदला आकारणे बंधनकारक आहे. मात्र सध्याच्या वापर प्रकरणांमध्ये महापालिकेच्या उत्पन्नाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

या भूखंडांचा वापर ‘स्वखर्चाने विकसित’ करण्याच्या अटीवर देण्यात आला असला तरी अनेक संस्था व व्यक्तींनी हे भूखंड आपल्या मालकीप्रमाणे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराच्या विकासात मोठा अडसर निर्माण झाला असून सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापरही होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

विशेषतः कुपवाड, मिरज, सांगली परिसरातील अनेक महत्वाच्या भूखंडांचा या यादीत समावेश असून – पार्श्वनाथ प्रतिष्ठानजवळील जागा, गुलमोहर कॉलनीतील प्लॉट, कृपा बंगल्याजवळील भूखंड, सिनर्जी जवळील प्लॉट, शाळा क्रमांक २५ समोरील ओपन स्पेस, सरस्वतीनगर, अण्णा सातगोंडा पाटीलनगर, चंदनवाडी, एसटी वर्कशॉप परिसर, वानलेसवाडी, पाचुंदेनगर, विश्रामबाग यांसारख्या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.

या सर्व भूखंडांचा तपशीलवार आढावा घेऊन महापालिकेने त्वरित कारवाई करावी, असे वळवडे यांनी स्पष्ट केले. सदर मालमत्ता बाजारभावानुसार भाडे कराराने वापरण्यास द्याव्यात किंवा महापालिकेच्या ताब्यात घेत पुनर्वापरासाठी नियोजन करावे, ही मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.