| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. १६ जुलै २०२५
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरून जयंतराव पाटील यांनी आज आपल्या कार्यकाळाची सांगता केली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा करत आपल्या कार्याचा मागोवा घेतला. नव्या प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या निवेदनात जयंतराव पाटील यांनी सांगितले की, पक्षाने पूर्वी वंशपरंपरेनुसार पदवाटप केले असले तरी त्यांनी ही परंपरा मोडत, सामान्य कुटुंबातील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली. मेहबूब शेख, सक्षणा सलगर, सुनील गव्हाणे यांसारख्या तरुणांना पुढे आणल्याचा त्यांनी उल्लेख केला. "शरद पवारसाहेबांचे नेतृत्व आणि दिशा आम्हाला कायम प्रेरणा देत राहणार आहे," असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय कारकीर्दीची झलक आणि...आपल्या भाषणाचा शेवट करताना त्यांनी एक भावनिक कविता सादर केली."हा शेवट नाही, एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे;नेतृत्व बदलेलं असलं, तरी निष्ठा अजून जिवंत आहे.मी फक्त सेनापती होतो, सेना अजून सज्ज आहे;पुरोगामी विचार हेच आमचे शस्त्र आहे.मी जातो आहे, पण पाठ फिरवत नाही;एक पाऊल मागे घेतलं, पण ध्येय अजून डोळ्यापुढे आहे.कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे;कामातूनच नाव उरेल, कारण मी ‘जयंत’ आहे!"
सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका
आपल्या भाषणात जयंतराव पाटील यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. "छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या स्वराज्याची आज विटंबना होत आहे. समाजात द्वेषाचे बी पेरले जात आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार फोफावतोय," अशी जहरी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत ते म्हणाले, "राज्यात शेतकरी अतिवृष्टी, दुष्काळ आणि मदतनिधीच्या अभावामुळे हतबल झाला आहे. लातुरात शेतकऱ्यांना स्वतः बैलांऐवजी नांगराला जुंपण्याची वेळ आली, हे अपमानास्पद आहे."
अधुऱ्या आश्वासनांचा पाढा
पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी सरकारने दिलेली बहुतेक आश्वासने अजूनही हवेत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, महिलांना २१०० रुपये मिळतील, तरुणांना रोजगार मिळेल, असे जे वचने दिले गेले, ती सगळी सध्या अपूर्ण आहेत. "हे सरकार लोकांच्या विश्वासाला तडा देत आहे," असा थेट आरोप त्यांनी केला.
निवडणुकीतील अपयशाचे कारण
विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, "आपण पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवली, पण अपेक्षित यश मिळालं नाही. कारण ही मॅच खेळण्यापूर्वीच अंपायर ठरलेला होता. बॉल स्टंपला लागूनही 'नो बॉल' दिली गेली."
लोकशाहीवर ठाम विश्वास
शेवटी त्यांनी पक्षाचे लोकशाहीधर्मी कार्य पद्धतीवर भर दिला. "हा पक्ष गरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेचा आहे. येथे प्रत्येक कार्यकर्त्याला थेट पवार साहेबांशी संवाद साधण्याचा अधिकार आहे, आणि तो पुढेही अबाधित राहील," असेही ते म्हणाले.